कोरोनात लाखो कमवलेल्या या ड्रायव्हरचं मार्केटींग बघून बडे मार्केटींग गुरू तोंडात बोट घालतील

ही गोष्ट आहे पुण्यातील चिंबळी येथे राहणाऱ्या आबा पाटील यांची. आबांचा गाडी चालवण्याचा व्यवसाय आहे. मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाला आणि सगळ्याच गोष्टी बंद झाल्या. ऑफिसवाले लोक घरून काम करत होते. मात्र ज्यांचं कामच ‘फिरणे’ हे आहे त्या गाडीवाल्यांची मात्र पंचाईत झाली.

आबांचीसुद्धा हीच परिस्थिती होती. इतर ड्रायव्हर सहकाऱ्यांप्रमाणे तेही सुरुवातीला हतबल झाले होते. गाडी बंद म्हणजे कमाई बंद. कमाई बंद म्हणजे उदरनिर्वाह बंद. थोडीफार शिल्लक होती त्यावर कसाबसा महिना दीड महिना निघणार होता.

एका नेहमीच्या कस्टमरने त्यांचं क्रेडिट कार्डच बिल भरलं त्यामुळे जरा हातभार लागला. पण हे असं किती दिवस चालणार? सरकारने ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली आणि आबांनी ठरवलं. आता शांत बसणे नाही. करोनामुळे बदलत्या परिस्थितीत आपण बदललं नाही तर धंदा मिळणार नाही हे आबांनी वेळीच जाणलं.

मार्केटिंगमध्ये फर्स्ट अथवा अर्ली मूव्हर ऍडव्हांटेज (First/ EarlyMover Advantage) नावाची एक संकल्पना आहे. आता आबांनी काही एमबीए केलेलं नसल्यामुळे त्यांना याबद्दल माहिती असणे शक्यच नव्हते.

पण आपण जर बदल लवकर केला तर त्याचा फायदा आपल्यालाच होणार हे आबांना ठाऊक होतं. ह्याला कारणीभूत त्यांचा २०-२२ वर्षांचा अनुभव होता. त्यांनी लागलीच गाडी काढली आणि एक महत्त्वाचं काम करून घेतलं. ते म्हणजे गाडीत ड्रायव्हरच्या सीटभोवती एक पारदर्शक पडदासदृश पार्टिशन करून घेतलं. ह्यामुळे झालं असं की गाडीत बसणाऱ्या कस्टमरला आपल्याला ड्रायव्हरपासून करोनाचा संसर्ग होईल ही भीती कमी होण्यास मदत झाली.

आबांनासुद्धा स्वतःच्या सुरक्षेची खात्री वाटू लागली. लगोलग आबांनी दुसरं महत्वाचं काम केलं. ते म्हणजे गाडीत स्वतःसाठी आणि कस्टमरसाठी सॅनिटायझर आणि हँडवॉश ठेवलं. सॅनिटायझरच थेट पाच लिटरचं कॅनच विकत घेतलं.

ही सगळी तजवीज झाली तरी अजून एक मुख्य काम बाकी होतं. ई-पास ला अप्लाय कसं करायचं हे अनेक लोकांना महितचं नव्हतं. इथं आबांचं टेक्नोसॅव्ही असणं कामाला आलं. ड्रायव्हर असले तरी फेसबुक, व्हाट्सअप्पवर आबांचा सहज संचार असतो. ऑनलाइन बँकिंग, क्रेडिट कार्डच बिल भरणे या गोष्टी त्यांनी उत्सुकतेने शिकून घेतल्यात.

कस्टमरकडून सगळे डिटेल्स घेऊन आबा आणि त्यांचा एक मित्र हेच ई-पासला अप्लाय करू लागले. टोकन नंबर आला की तो कस्टमरला देऊन त्याला पोलीस चौकीत जायला सांगायचे. पास मंजूर झाला की ट्रिप ठरलेली.

एवढं सगळं केलं तरी धंदा होईलच याची खात्री नव्हती. मार्केटिंगशिवाय कुठलाही धंदा चालतो कुठे? मग आबांनी जोरदार मार्केटिंग सुरू केलं. कस्टमरला ज्याची भीती आहे तीच गोष्ट आपल्या गाडीत नाही याची खात्री आबांनी त्यांना करून दिली.

प्रत्येक ट्रिप नंतर आपण गाडी पूर्णपणे सॅनिटाईझ करून मगच पुढची ट्रिप सुरू करतो हे त्यांनी कस्टमरला सांगितले. यासाठी आबांनी एक खास मेसेज तयार केला. त्या मेसेजमध्ये आपण पुरवत असलेल्या सगळ्या सुविधांचा उल्लेख केला. अगदी तुम्हाला ई-पास काढता येत नसेल तरी हरकत नाही,आम्ही तुमची मदत करू असेही सांगितले.

आजवर जोडलेल्या सगळ्या कस्टमर्सला हा मेसेज त्यांनी पाठवून दिला. स्वतःच्या व्हाट्सअप्प स्टेट्सला ठेवला. ड्रायव्हर लोकांच्या ग्रुपवर, ते राहत असलेल्या सोसायटीच्या ग्रुपवर, नातेवाईकांच्या ग्रुपवर जिथे शक्य आहे तिथे सगळीकडे तो मेसेज फिरवला. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आबा पुरवत असलेल्या सुविधा पोहोचल्या.

यातूनच मग लॉकडाऊन ऐन भरात असताना आबांना ट्रिप मिळायला सुरुवात झाली. एकदा ट्रिप येऊ लागल्यावर मग काही विचारू नका. आबांना उसंत नव्हती एवढ्या ट्रिप येऊ लागल्या. त्यावेळी रस्तेही मोकळे असायचे. प्रवासही वेगात व्हायचा. या सगळ्यात आबांनी काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या.

कुठेही जायचे झाले तरी त्यांनी घरून डबा नेला.ट्रिप पूर्ण करून परत येण्यासाठी एकाहून अधिक दिवस लागणार असले तरी तेवढ्या दिवसांचा डबा बांधून नेला. हॉटेल वगैरे काही सुरू नव्हतेच आणि असलं तरी बाहेर खाण्यात धोका होताच.

संपूर्ण प्रवासात आबा शक्य होईल तेवढे कोमट पाणी पीत. काहीवेळा असंही झालं की आबांना त्यांच्या सासुरवाडीची ट्रिप मिळाली. जावई घरी आला म्हणजे सासुरवाडीचे लोक जेवायला घालणारच. मात्र आपल्यामुळे त्यांना काही धोका नको म्हणून आबा चक्क ओट्यावर बसून जेवले. या काळात शहरातून गावाला गेलेल्या लोकांना गावच्या लोकांनी फारशी चांगली वागणूक दिली नाही.

आबांना याची कल्पना होती. म्हणूनच आपल्या स्वतःच्या गावच्या फाट्यावरून दोन तीन वेळा जाऊनही आबा घरी गेले नाहीत.आपल्यामुळे घरच्यांना गावकऱ्यांचा त्रास नको ही त्यामागची भावना. कस्टमरला त्याच्या गंतव्य ठिकाणी सोडलं की आबा अजिबात वेळ न घालवता त्वरित गाडी फिरवून परतीचा प्रवास करत.

पुण्यात आले की गाडीत सॅनिटायझर मारून गाडी पूर्ण स्वच्छ करून मगच आबा घरी जात. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी पुणे मुंबईतून आपल्या गावी जाणे पसंत केले. त्यासाठी पडेल ती रक्कम मोजण्याची लोकांची तयारी होती. या परिस्थितीचा फायदा घेऊन अनेकांनी अव्वाच्या सव्वा पैसे घेतले. इथेही आबांनी त्यांचं वेगळेपण दाखवून दिलं.

ट्रीपमध्ये जाऊन येऊन होणाऱ्या किलोमीटरसाठी एरवी ज्या दराने पैसे आकारले जातात त्याच दराने आबांनी पैसे आकारले. कुठेही पैशाची हाव ठेवली नाही. आबांचा हाच प्रामाणिकपणा अनेकांना भावला आणि त्यांनी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आबांचाच नंबर दिला. साहजिकच आबांना ट्रिप मिळत राहिल्या.

इतर सगळे ड्रायव्हर ट्रिप कधी येईल याची वाट बघत असताना वेळीच आपल्या धोरणात बदल केल्याने आबा मात्र पार नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, कोकणातील लांजा, गुजरातेत कच्छ, सुरत, अहमदाबाद, मध्य प्रदेशात इंदोर ,भोपाळ अशा ट्रिप मारत होते.

-आदित्य गोपाळ गुंड

महत्वाच्या बातम्या
‘या’ अभिनेत्रीने काहीच नसणाऱ्या अक्षयकुमारला रातोरात स्टार बनवले होते; पण पुढे..
वा रं मर्दा! अभिनेता रुग्णवाहिका चालवून रुग्णांची करतोय सेवा; दिवसरात्र करतोय रुग्णांची मदत
धक्कादायक! मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील ‘या’ कलाकाराचे झाले निधन, कलाविश्वात हळहळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.