DJ : नाशिकच्या फुलेनगर भागात रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या डीजेमुळे झालेल्या मोठ्या आवाजानंतर ३२ वर्षीय नितीन फकिरा रणदिवे यांची प्रकृती अचानक खालावली आणि उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे डीजेच्या आवाजाचा आरोग्यावर होणारा संभाव्य घातक परिणाम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
डीजेचा(DJ) आवाज आणि आरोग्यावर परिणाम
नितीन रणदिवे हे गेली चार वर्षे क्षयरोगाचे रुग्ण होते. डीजे(DJ) जवळ उभं असताना त्यांना अचानक चक्कर आली, नाक आणि तोंडातून रक्तस्राव झाला आणि त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमागे डीजेच्या आवाजाचा ताण कारणीभूत आहे का, याची चौकशी सुरू आहे.
वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. केशव काळे यांच्या मते, १०० डेसिबलपेक्षा जास्त आवाजामुळे कानाचा पडदा फाटण्यापासून ते थेट हृदयविकाराच्या झटक्यापर्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात. १२० डेसिबलपेक्षा अधिक तीव्रतेचा आवाज काही वेळेस माणसाच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकतो.
ध्वनी प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे परिणाम
डॉ. काळे सांगतात की, अतिप्रचंड आवाजामुळे हृदयावर ताण येतो, रक्तदाब वाढतो, आणि श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूवरील ताणामुळे मृत्यू देखील ओढवू शकतो. विशेषतः ज्यांना हृदय किंवा श्वसनाचे आजार आहेत, त्यांनी डीजे, लाऊड स्पीकर किंवा प्रचंड गर्दीच्या ठिकाणी जाणं शक्यतो टाळावं.
सावधगिरीचे उपाय
या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांनी काही उपाय सुचवले आहेत: मोठ्या आवाजाच्या ठिकाणी कानात कापूस किंवा एअर प्लगचा वापर करावा. शक्यतो स्पीकरपासून दूर राहावं. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींनी अशा ठिकाणी जाणे टाळावे.
या घटनेनंतर मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टीम वापरण्याबाबत जबाबदारीने विचार करण्याची गरज आहे. सण-उत्सव साजरे करताना, आनंदाच्या ठिकाणी कोणाचं आयुष्य धोक्यात येणार नाही याची काळजी घेणं समाज म्हणून आपली जबाबदारी आहे.
man-dies-due-to-dj-noise-in-nashik