मटन बनवायला उशीर केला म्हणून नवऱ्याने पाडले बायकोचे दात

पुणे | पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने बाहेरून मटण आणले आणि पत्नीला बनविण्यासाठी सांगितले. पण पत्नी म्हणाली की, मटण बनवायला दीड तास लागेल.

पत्नीचे हे उत्तर ऐकून पतीला राग अनावर झाला आणि त्याने शिवीगाळ करत थेट पत्नीचे दातच पाडले. औंधमध्ये हा प्रकार घडला असून संबंधित व्यक्तिविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असुन एका ४० वर्षीय युवतीने यासंदर्भात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रभाकरण नाडार असे आरोपीचे नाव आहे. प्रभाकरण दोन दिवसांपूर्वी दारू पिऊन घरी आला होता.

येताना त्याने मटण आणले आणि पत्नीला दिले. पत्नी दुसऱ्या कामात व्यस्त असल्यामुळे ती म्हणाली की मटण बनवायला दीड तास लागेल. मटण बनवायला इतका वेळ का लागेल? अशी विचारणा त्याने केली.

पत्नी आपले ऐकत नाही याचा राग त्याला अनावर झाला आणि त्याने शिवीगाळ करत पत्नीला मारहाण केली. मारहाण करताना पतीने एक ठोसा पत्नीच्या तोंडावर दिला आणि त्यात तिचे दात पडले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.