Malcolm Jamal Warner Death : एका प्रसिद्ध अमेरिकन कलाकाराच्या मृत्यूने साऱ्या मनोरंजन क्षेत्रात हळहळ पसरली आहे. ५४ वर्षांचा लोकप्रिय अभिनेता आणि गायक माल्कम-जमाल वॉर्नर (Malcolm-Jamal Warner) याचा समुद्रात पोहताना आकस्मिक मृत्यू झाला आहे. रविवारी लिमन (Limon) इथल्या प्लाया कोकल्स (Playa Cocles) या समुद्रकिनाऱ्यावर पोहायला गेलेल्या वॉर्नरला अचानक आलेल्या जोरदार लाटेने ओढून नेलं आणि तेथून त्याचा प्राण गेला. ही बातमी येताच त्याच्या चाहत्यांमध्ये, सहकाऱ्यांमध्ये आणि हॉलीवूड (Hollywood) सृष्टीत शोकाची लाट उसळली आहे.
पोहताना लाटेने ओढलं, जागीच मृत्यू
कोस्टा रिका पोलिसांच्या तपास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी माल्कम-जमाल वॉर्नर (Malcolm-Jamal Warner) समुद्रात पोहत असताना एक मोठी लाट त्याच्यावर आदळली आणि ती त्याला खोल समुद्रात घेऊन गेली. पाण्याचा जोर इतका होता की तो सावरूच शकला नाही. बघता बघता त्याचा जीव गेला. ही घटना पाहणाऱ्यांच्या डोळ्यांदेखत घडली. त्याचा मृतदेह तातडीनं किनाऱ्यावर आणण्यात आला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
काय होती त्याची ओळख?
माल्कम-जमाल वॉर्नर (Malcolm-Jamal Warner) हा अमेरिकेतील एक प्रसिद्ध अभिनेते आणि गायक होता. त्याची ओळख मुख्यतः १९८४ ते १९९२ दरम्यान एनबीसी वाहिनीवर प्रसारित झालेल्या प्रसिद्ध सिटकॉम ‘द कॉस्बी शो (The Cosby Show)’ मधील ‘थिओ हक्सटेबल’ या भूमिकेमुळे झाली होती. या मालिकेतील त्याचे काम खूपच गाजले. याच शोमधील भूमिकेसाठी त्याला १९८६ साली एमी पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळाले होते.
चित्रपट आणि मालिकांमधील योगदान
‘द कॉस्बी शो (The Cosby Show)’ नंतरही त्याने आपल्या अभिनयाच्या प्रवासात अनेक शो आणि चित्रपट केले. १९९६ ते २००० या काळात तो ‘मॅल्कम अँड एडी (Malcolm & Eddie)’ या कॉमेडी शोमध्ये दिसला होता. २०१० मध्ये ‘रीड बिटवीन द लाईन्स (Reed Between the Lines)’ या बीईटी सिटकॉममध्येही त्याने काम केले. याशिवाय ‘द रेसिडेंट (The Resident)’ आणि ‘अमेरिकन क्राइम स्टोरी (American Crime Story)’ या मालिकांमधून तो प्रेक्षकांसमोर आला. २००८ मध्ये ‘फूल (Fool)’ या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटातही त्याची भूमिका होती.
माल्कमच्या अचानक जाण्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. तो एक प्रतिभावान अभिनेता आणि उत्तम गायक होता. त्याचा चेहरा कित्येक घरांमध्ये टीव्हीवर दिसत असे. त्याच्या जाण्याने एका यशस्वी कलाकाराचा प्रवास असमाप्त राहिला. हॉलीवूड आणि त्याचे चाहते या साऱ्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.





