Share

Makarand Anaspure On Compulsion Of Hindi Language: महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी का नको? अभिनेते मकरंद अनासपुरेंनी सांगितलं कारण, म्हणाले…

Makarand Anaspure On Compulsion Of Hindi Language:  महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) नव्या बदलांची अंमलबजावणी सुरू होत असताना, पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या सक्तीवरून राज्यात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने (Central Government) तीन भाषांच्या शिकवणीवर भर देताना हिंदी भाषेला अनिवार्य करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मराठी कलावंत आणि नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून, मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांनी देखील आपली परखड मते मांडली आहेत.

“पहिलीपासून हिंदी शिकवण्याचं प्रयोजनच काय?” – अनासपुरे यांचा सवाल

माध्यमांशी बोलताना मकरंद अनासपुरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पहिलीपासून हिंदी शिकवण्याची सक्ती चुकीची आहे. “मुलं लहान वयातच मातृभाषेत शिकत असतात. त्या वयात हिंदीसारखी दुसरी भाषा लादणं चुकीचं आहे. कारण मराठी आणि हिंदी दोन्ही देवनागरी लिपीत असल्या तरी व्याकरण वेगळं आहे. त्यामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे,” असं ते म्हणाले.

‘भाषा गरजेपुरती शिकली जाते, लादली जाऊ नये’

मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या स्वतःच्या सिनेमातील अनुभव सांगितला. ते म्हणाले, “मी एकदा ‘पिंजरेवाली मुनिया’ नावाच्या भोजपुरी सिनेमात काम केलं आहे. भोजपुरी मला येत नव्हती, पण गरजेनुसार मी संवाद साधले. त्यामुळे माणूस भाषेचा वापर गरजेनुसार करतो, सक्तीने नव्हे.”

ते पुढे म्हणाले की, “इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मराठी नीट यावी, हीच सर्वात मोठी जबाबदारी आहे. अशावेळी त्यांच्यावर हिंदी लादणं योग्य नाही. आमच्या काळातही आम्ही पाचवीपासून हिंदी शिकलो आणि त्यामुळे फारसा फरक पडला नाही.” ते म्हणाले की, शिक्षणात मातृभाषेचा सखोल आधार असणं गरजेचं आहे. इतर भाषा हळूहळू शिकल्या तरी चालतात.

मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या घरातली एक आठवण सांगितली. “माझा मुलगा एकदा म्हणाला की, ‘मी कोशिश केली पण जमलं नाही’. तेव्हा मी बायकोला सांगितलं की घरात शुद्ध मराठी बोलली गेली पाहिजे. आपली भाषा आपल्याला आत्मसन्मान देते.” ते पुढे म्हणाले की, “भाषा आपल्याला मोठं करत नाही, आपण भाषेमुळे मोठे होतो. म्हणूनच आपल्या मातृभाषेवर अभिमान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.”

ताज्या बातम्या मनोरंजन शिक्षण

Join WhatsApp

Join Now