महाराष्ट्र पोलिसांनी २५ कोटींचे हेरोईन पकडले, पण ‘हिरॉईन’ नव्हती म्हणून त्यांचे कुणी कौतूक केले नाही; ठाकरेंचा भाजपला टोला

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात एनसीबीच्या कारवाईमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्यात सतत बाचाबाची होत असते. आता मुख्यमंत्री उद्धव यांनी यावर भाष्य केले आहे. अमली पदार्थाला सध्या मोठे पेव फुटले आहे आणि त्यावरून महाराष्ट्राला लक्ष्य केले जात आहे.

पण महाराष्ट्र बोलघेवड्यांचे राज्य नाही. येथे जे बोलले जाते ते करूनही दाखवले जाते, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांनी यावेळी विरोधकांचा समाचार घेतला आहे. त्यांनी विरोधकांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला आहे.

तसेच अमली पदार्थांच्या धाडीवरून विशेष चमूचे विशेष कौतुक होत आहे. कारण त्यात ‘हिरो’ होते आणि त्यामुळे या विशेष चमूलाही प्रसिद्धी मिळाली. चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी २५ कोटी रुपयांचे ‘हिरोईन’ पकडले, पण त्यात ‘हिरॉईन’ नव्हती.

त्यामुळेच एवढ्या मोठ्या कामगिरीची कुठेही दखल घेतली गेली नाही. या कामगिरीचे कौतुकही झाले नाही. महाराष्ट्र पोलीस दल मजबूत आहे, तत्पर आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तो आपल्याला मोडून काढायचा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, जगातील अमली पदार्थ जणू काही फक्त महाराष्ट्रातच तयार होत आहेत आणि ते पकडण्याची कामगिरी फक्त विशेष पथक पार पाडू शकते, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीला डावलण्याचा प्रयत्न होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही. त्यावेळी एनसीबीच्या कारवाईवरून मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला. त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.