Ajit Pawar : बारामती (Baramati) येथे झालेल्या सावित्री हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट आणि स्पष्ट भाषेत काही मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी आई-वडिलांबद्दल आदर, शिस्तपालन, आणि सार्वजनिक मालमत्तेच्या संवर्धनाबाबत सखोल विचार मांडले. नियम मोडणाऱ्यांना त्यांनी चांगलाच दम भरला.
“आई-वडिलांचं मोल समजून घ्या”
“आपण आज समाजात आहोत, ते आपल्या आई-वडिलांमुळे. म्हणून शेवटपर्यंत त्यांना विसरू नका,” असं सांगत अजित पवार यांनी तरुण पिढीला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. ते म्हणाले, “जेव्हा मी बारामतीला येतो, तेव्हा सर्वप्रथम माझ्या आईला भेटतो. काल रात्रीही मी तिचं दर्शन घेतलं. गप्पा मारल्या. आईशी आपुलकीनं वागावं, हे फार महत्त्वाचं आहे.”
रस्त्यांवर कचरा आणि जनावरांचा उपद्रव नकोच!
अजित पवार यांनी सांगितलं की, “काही नागरिक रस्त्यांवर कचरा टाकतात, जनावरं सोडतात. अशांना आधी समज देतो, पण तरीही ऐकलं नाही, तर त्यांच्यावर कारवाई होईल. जनावरं रस्त्यावर मोकळी सोडणाऱ्यांवर केस दाखल होतील.”
‘टायरमध्ये घालून झोडा’
“काही दुचाकीस्वार चुकीच्या पद्धतीने गाडी चालवतात, राँग साइडने जातात. असा कोणी सापडला, तर तो कोणाचाही मुलगा असो – मोठ्या बापाचा असला तरी – त्याला टायरमध्ये घालून चांगलंच झोडायला सांगणार आहे. अशा प्रकारच्या व्यक्तीला दहा पिढ्या आठवाव्यात, असं थेट बजावलं,” अशी रोखठोक भाषा अजित पवारांनी वापरली.
‘सगळ्यांना सारखाच नियम लागू’
“नियम फक्त इतरांसाठी नाहीत. मी, माझा नातेवाईक कोणताही असो नियम मोडला तर शिक्षा झालीच पाहिजे. नियम सगळ्यांसाठी सारखे असले पाहिजेत,” असं म्हणत त्यांनी निष्पक्षतेचा संदेश दिला.
ते म्हणाले, “मी अनेक ठिकाणी झाडं लावली आहेत. पण जनावरे ती खाऊन टाकतात. लोकांनी मुद्दाम झाडं वाचवली पाहिजेत. काही ठिकाणी बसण्यासाठी जागा केली, तरी काही लोक तिथे दुचाकी घालून बसलेले दिसतात. अशा व्यक्तींच्यावर कठोर कारवाई करावी लागेल.”
“सध्याची पिढी आई-वडिलांकडे दुर्लक्ष करते, त्यांच्याशी नीट वागत नाही. अशा वागणुकीला माझा विरोध आहे. प्रत्येकाने आपल्या मूळांकडे पाहिलं पाहिजे. प्रेमाने, आपुलकीनं त्यांच्याशी वागलं पाहिजे,” असं ते शेवटी म्हणाले.