Share

Bala Banger On Walmik Karad: धक्कादायक! “धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती”, बाळा बांगरांचा गौप्यस्फोट

Bala Banger On Walmik Karad:  बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parli) परिसर पुन्हा एकदा खळबळून गेला आहे. महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या हत्या प्रकरणात आता नवे वळण आले असून, बाळा बांगर (Bala Banger) यांनी थेट वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर गंभीर आरोप करत राजकीय खळबळ उडवून दिली आहे.

महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडीमार्फत व्हावा, या मागणीसाठी कन्हेरवाडी (Kanherwadi) व भोपळा (Bhopla) गावातील ग्रामस्थांनी परळी-अंबाजोगाई मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनात माजी सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे भाऊ धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) देखील सहभागी झाले.

याच आंदोलनात उपस्थित राहिलेले बाळा बांगर, जे पूर्वी आरोपी वाल्मिक कराडचे निकटवर्तीय होते, यांनी माध्यमांसमोर काही धक्कादायक वक्तव्य केली. त्यांनी सांगितले की, “वाल्मिक कराडने परळी (Parli) शहरात राजकीय आणि सामाजिक कीड लावली आहे. प्रशासन देखील त्याच्या टोळीला पाठीशी घालत आहे. माझ्यावर दबाव आणला जात होता की मी या प्रकरणात बोलू नये, पण मी माघार घेणार नाही.”

धक्कादायक आरोप

बाळा बांगर यांच्या म्हणण्यानुसार, “वाल्मिक कराडचा कट होता की, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना संपवून स्वतःसाठी पोटनिवडणुकीची संधी निर्माण करायची. त्यासाठीच त्याने पीए प्रशांत जोशी (Prashant Joshi) यांच्यावरही हल्ल्याचा कट रचला होता.”

त्यांनी आणखी सांगितले की, “कराड टोळीमध्ये काही महिला सदस्यही सक्रिय होत्या आणि अनेक पुरावे माझ्याकडे आहेत. या सगळ्या प्रकरणात लवकरच मी पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करणार आहे. मी स्वतः उपोषणाला बसणार असून, रेकॉर्डिंग प्रकरणात सीडीआर मागवण्याची मागणी करणार आहे.”

प्रशासनावरील अविश्वास

बाळा बांगर यांनी स्पष्टपणे सांगितले की, “माझा परळी पोलिसांवर विश्वास उरलेला नाही. जेव्हा पर्यंत या प्रकरणात ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत मी मागे हटणार नाही.”

या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. संतोष देशमुख यांचा मृत्यू, महादेव मुंडे यांची हत्या आणि बाळा बांगर यांच्या आरोपांमुळे परळी परिसर पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now