Kolhapur : शेवटी आई ती आईच… शेळीच्या पिल्लाला कुशीत घेऊन श्वान दररोज पाजते दुध; दिलं नवजीवन

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा अर्दाळ (Ardal Village) गावात माणुसकीलाही लाजवेल अशी जिवंत ममतेची गोष्ट घडली आहे. शांताबाई यादव (Shantabai Yadav) यांच्या अंगणात पाळलेल्या मादी श्वाननं एका जीवाला अक्षरशः दुसरं जन्मदान दिलं. अशक्त झालेलं एका शेळीचं पिलू आईचं दूध पिऊ शकत नव्हतं, तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. हे सगळं बघताच घरातील मादी श्वाननं स्वतःकडे उरलेल्या मायेचं दान त्या छोट्या पिलाला देण्याचा निर्णय घेतला.

आजरा (Ajara Taluka) भागात घडलेली ही घटना लोकांच्या मनाला हात घालणारी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी शांताबाई यांच्या शेळीला तीन पिलं झाली होती. दोन पिल्लं सशक्त पण तिसरं पिलू जन्मत:च कमजोर. आईचे दूध घेण्याची ताकद नसल्याने त्याचा जीव धोक्यात होता. याच वेळी, काही दिवसांपूर्वी स्वतःच्या पिल्लांना गमावलेली मादी श्वान त्या दुबळ्या पिलूजवळ जाऊन बसली आणि त्याला दूध पाजू लागली. तिच्या या कृतीनं कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी आलं.

दुबळ्या पिलासाठी श्वान बनली खऱ्या अर्थानं ‘आई’

मादी श्वाननं एकदा नव्हे, तर दररोज त्या पिलाला दूध पाजणं सुरू ठेवलं. इतकंच नाही तर ती त्याच्यावर जसं स्वतःच्या लेकरावर प्रेम करावं तसं करत आहे. पिलूही आता तिच्याभोवतीच फिरतं, तिच्याजवळच शांत झोपतं. या प्रेमळ नात्यानं गावात आश्चर्य आणि कौतुक दोन्ही निर्माण केलं आहे.

प्रेम, माया आणि संवेदनेचा जिवंत धडा

ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच हजारो लोकांनी प्राण्यांमधील निस्वार्थ प्रेमाचं कौतुक केलं. माणसांमध्ये कमी होत चाललेली माणुसकी, प्राण्यांमध्ये मात्र अजूनही तितकीच जिवंत आहे… हे या घटनेनं पुन्हा सिद्ध झालं. गावातील नागरिक शांताबाई यांच्या घरी जाऊन हे दृश्य पाहत आहेत आणि ममतेचा जिवंत प्रत्यय घेत आहेत.