दत्ताकाका सारखा बहुमूल्य धैर्यवान मित्र गमावला; आमदार लक्ष्मण जगताप यांची श्रद्धांजली

 

पिंपरी। पिंपरी चिंचवड शहराची आजची सकाळ सुन्न करणाऱ्या घटनेने झाली. माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले, अशी बातमी आली आणि धक्काच बसला.

दत्ताकाकाच्या जाण्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक राजकीय नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून दत्ताकाकांना श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान आमदार लक्ष्मण जगताप यांनीही साने यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, “काहींना जन्मतःच समृद्ध जीवनाचा वारसा मिळतो. तर काही जण आपले जीवन स्वतः घडवतात. दत्ताकाका साने म्हणजे स्वकर्तुत्वाने घडलेला माणूस.

त्याने २५ वर्षापूर्वी राजकारणात पाय ठेवला. दिवंगत महापौर मधुकरराव पवळे यांच्यापासून दत्ताकाका माझ्यासोबत होता. धडाडीचा उमदा आणि अभ्यासू दत्ताकाका मी जवळून अनुभवला आहे.

माझे दुःख व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. एक राजकीय नेता म्हणून दत्ताकाका यांनी पिंपरी-चिंचवडला महत्त्वाचे योगदान दिले. दत्ताकाकाहे चिखली विभागातील किंगमेकर होते.

राजकारणात जनतेच्या संयमाची जाणीव असावी लागते. ती दत्ताकाका यांच्याकडे होती. ते प्रत्येक निवडणूक सहज जिंकायचे. दत्ताकाकांनी अनेक मित्र जोडले होते. समाजातील प्रत्येक घटकांना ते आपलेसे वाटायचे.

दत्ताकाकांची राजकीय वाटचाल सर्वसामान्यांना प्रेरणा देणारी होती. कोणत्याही माणसाशी सहज मैत्री करणारा व आत्मभान असणारा एक बहुमूल्य धैर्यवान मित्र मी गमावला आहे.

सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या संघर्षात सुद्धा त्यांनी मैत्रीला बाधा येऊन दिली नाही. एन उमेदवारीच्या काळात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला चांगले दिवस आले असताना काळाने अशा पद्धतीने दत्ताकाकांना ओढून घेणे मनाला पटणारे नाही.

त्यांचे निधन खूपच दुःखद आहे. त्यांच्या जाण्यामुळे पिंपरी-चिंचवडलाचा अभ्यास असणारा नेता हरवला आहे”. अशा दुःखद भावना जगताप यांनी व्यक्त केल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.