Pahalgam attack : २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व्यापक शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घटना घडली आहे – नदीकिनारी एका २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव इम्तियाज अहमद मगरे असून तो कुलगाम जिल्ह्यातील दमहाल हांजीपोरा परिसरातील तंगमार्ग गावातील रहिवासी होता. मजूरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या इम्तियाजला सुरक्षा दलांनी हल्ल्यानंतर चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्यावर दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप होता.
या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये इम्तियाज सुरक्षा दलांपासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसतो, तो नदीकाठी जातो आणि पळून जाण्याच्या उद्देशाने नदीत उडी घेतो. यानंतर त्याचा मृतदेह रविवारी सकाळी सापडला. पोलिसांनी सांगितले की, तो कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन दरम्यान नजरेखाली होता आणि लपण्याच्या प्रयत्नात नदीत पडून त्याचा मृत्यू झाला असावा.
मात्र या घटनेनंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पॉप्युलर डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या महबूबा मुफ्ती यांनी इम्तियाजचा मृत्यू “सुरक्षा दलाच्या ताब्यात असताना” झाल्याचे नमूद करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि मृत्यू एका कटाचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
सध्या या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले असून मृत्यूच्या नेमक्या कारणांची चौकशी केली जात आहे.
local-kashmiri-woman-who-helped-terrorists-in-pahalgam-attack-tells-police