Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar Group) च्या नेते शिवराज बांगर (Shivraj Bangar) यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “तुमचे केवळ पाच टक्केच उघड झाले आहेत, आणखी उघड झाल्यास तुम्हाला पंधराशे दिवस घरात लपून बसावं लागेल,” अशा शब्दांत त्यांनी धनंजय मुंडेंना इशारा दिला.
शिवराज बांगर यांनी असा आरोप केला की, जर धनंजय मुंडे यांना अन्यायाविरुद्ध खरोखरच चीड असेल आणि न्यायाची जाणीव असेल, तर त्यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येवर भाष्य करायला हवे होते. बीड (Beed) मधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणावर त्यांनी बोलल्याबद्दल अभिनंदन, परंतु केवळ एकाच प्रकरणावर लक्ष केंद्रित करून इतर गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परळीतील घटनांवर गंभीर आरोप
शिवराज बांगर यांनी परळी (Parli) येथील सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale) यांच्या हत्येच्या कटासंदर्भातही सवाल उपस्थित केला. “हा कट नेमका कोठे रचला गेला? करुणा मुंडे (Karuna Munde) यांच्या गाडीत बंदूक कोणी ठेवली?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
त्यांनी मागणी केली की या प्रकरणाशी संबंधित सर्व मोबाईल संवादांचे CDR म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड्स बाहेर काढावेत. “धनंजय मुंडे यांना न्यायाची जाणीव असल्याचे वाटते, तर त्यांनी सरपंच देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा,” असेही ते म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्या CDR ची मागणी
शिवराज बांगर यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड (Valmik Karad) तब्बल 21 दिवस कोणाच्या संपर्कात होते याचेही सीडीआर समोर यावेत अशी मागणी केली. त्यांनी असा दावा केला की, आरोपींची नावे सर्वांनाच माहित आहेत, पण अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
तसेच महादेव मुंडे (Mahadev Munde) यांचा खून तहसील कार्यालयासमोर झाला होता, त्यालाही 20 महिने झाले, तरी आरोपी सापडलेले नाहीत. त्याचे सीडीआर तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बीडमधील अल्पवयीन मुलीच्या प्रकरणावरून प्रतिक्रिया
बीड (Beed) मधील एका 17 वर्षीय विद्यार्थिनीवर कोचिंग क्लासमधील दोन शिक्षकांनी लैंगिक छळ केल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. या शिक्षकांची नावे विजय पवार (Vijay Pawar) आणि प्रशांत खाटोकर (Prashant Khatokar) अशी असून त्यांच्यावर पोस्को कायद्यांतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, विजय पवार (Vijay Pawar) हा आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचा “राईट हॅन्ड” असल्याचा गंभीर आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर बीड बंदची हाक देण्यात आली होती, मात्र आरोपींना अटक झाल्यानंतर बंद मागे घेण्यात आला.