Share

Lalbaugcha Raja Visarjan 2025: …अन् मुंबईच्या स्थानिक कोळी बांधवांनी गुजराती तराफ्यावर अडकलेल्या लालबागच्या राजाला धरुन ठेवलं, VIDEO व्हायरल

Lalbaugcha Raja Visarjan 2025: मुंबईत (Mumbai city) जगप्रसिद्ध लालबागच्या राजाचा (Lalbaugcha Raja) विसर्जन सोहळा यंदा मोठ्या अडथळ्यांनंतर पार पडला. शनिवारी सकाळी १० वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली होती. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळपर्यंत विसर्जन होण्याची अपेक्षा होती. मात्र, यंदा समुद्रातील भरतीमुळे आणि नवीन आणलेल्या स्वयंचलित तराफ्याच्या अकार्यक्षमतेमुळे विसर्जन तब्बल रात्री ९ वाजेपर्यंत लांबले. यामुळे एकूण ३३ तासांनी हा सोहळा संपन्न झाला.

समुद्रात भरती आणि मूर्ती पाण्यात अडकली

रविवारी सकाळी गिरगाव चौपाटीवर (Girgaon Chowpatty) मूर्ती आणण्यात आली. त्यानंतर काही तासांत विसर्जन होईल असे वाटत होते. पण सकाळी समुद्राला जोरदार भरती आली. पाणी झपाट्याने वाढल्याने मूर्तीचा अर्धा भाग समुद्रात बुडाला. कार्यकर्त्यांना आणि भाविकांना छातीपर्यंत पाणी आले. लाटा डोक्यावरून उसळत असल्याने मंडळातील कार्यकर्त्यांना किनाऱ्यावर परतावे लागले.

कोळी बांधवांची निष्ठा

या कठीण परिस्थितीत कोळी बांधवांनी मात्र मूर्तीला साथ दिली. काही तरुण समुद्रात उतरून मूर्तीभोवती कोंडाळे करून उभे राहिले. त्यांनी लालबागच्या राजाला वाहून जाण्यापासून रोखले. पाण्याचा स्तर मूर्तीच्या कंबरेवर पोहोचला तरीही कोळी बांधव मूर्तीला आधार देत राहिले. या दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्वत्र कौतुक होत आहे.

स्वयंचलित तराफा ठरला अपयशी

पूर्वी विसर्जनासाठी कोळी बांधवांच्या बोटींचा तराफा वापरला जात असे. मात्र, यंदा मंडळाने गुजरात (Gujarat state) येथून हायड्रोलिक यंत्रणा असलेला स्वयंचलित तराफा आणला होता. मोठ्या गाजावाज्याने आणलेला हा तराफा भरतीसमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरला. परिणामी विसर्जनाची प्रक्रिया जवळपास १२ तास उशिरा पार पडली.

भक्तांच्या मनात कोळी बांधवांविषयी कृतज्ञता

गेल्या अनेक दशकांपासून कोळी समाज लालबागच्या राजाच्या विसर्जनात महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे. यंदाही स्वयंचलित यंत्रणा निकामी ठरली असताना कोळी बांधवांनी दाखवलेल्या निष्ठेमुळे गणेशभक्तांच्या मनात त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि आदर अधिकच वाढला आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now