India Rain News : भारतीय हवामान विभागाने (IMD) जुलै 2025 साठी पावसाचा व्यापक अंदाज जाहीर केला असून, देशातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र ईशान्य भारत (North-East India), पूर्व भारत (East India) आणि काही दक्षिणेकडील (Southern Peninsular) भागांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र (Dr. Mrutyunjay Mohapatra) यांनी स्पष्ट केलं की, जुलै महिन्यात देशभरातील एकूण मासिक पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या (Long Period Average – LPA) सुमारे 106 टक्क्यांहून अधिक असण्याची शक्यता आहे. भारतात जुलैमध्ये सरासरी 280 मिमी इतका पाऊस होतो. यावर्षीचा अतिरिक्त पाऊस शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतो.
परंतु, जास्त पावसासोबत संकटांची शक्यता नाकारता येणार नाही. पूर, भूस्खलन, वाहतुकीत अडथळे आणि जलजन्य आजार यासारखे धोके अधिक पावसामुळे वाढू शकतात, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
कोणत्या भागांमध्ये होणार कमी पाऊस?
ईशान्य भारत, पश्चिम बंगाल (West Bengal), ओडिशा (Odisha), आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) काही भागांमध्ये, तसेच राजस्थान (Rajasthan) आणि पंजाब (Punjab)सारख्या वायव्य भारतातील प्रदेशांमध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
तापमानही घसरेल का?
ज्याठिकाणी अधिक पाऊस होईल, त्या भागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा थोडं खाली राहू शकतं. मात्र जिथं पाऊस कमी पडेल, तिथं उष्णता जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जून महिन्यात कसा होता पावसाचा आलेख?
हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, जून 2025 मध्ये देशात एकूण सरासरीच्या तुलनेत 9 टक्के जास्त पाऊस झाला. यामध्ये:
-
पूर्व भारतात : -16.9 टक्के कमी
-
दक्षिण भारतात : -2.7 टक्के कमी
-
वायव्य भारतात : +42.2 टक्के अधिक
-
मध्य भारतात: +24.8 टक्के अधिक पर्जन्यवृष्टी झाली.
देशातील काही नद्या, धरणं आणि जलाशयांमध्ये यामुळे जलसाठा वाढला आहे.