Kiran Mane : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सरकारकडून कठोर उत्तर देण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेते किरण माने यांनी वेगळ्या मुद्द्याला हात घालत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
किरण माने यांनी अंबरनाथ बलात्कार प्रकरण आणि आरोपी अक्षय शिंदेच्या कथित खोट्या एन्काउंटरचा उल्लेख करत मीडियावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “माध्यमांनी गुन्हा घडल्यानंतर लगेच आरोपी ठरवून त्याचा एन्काउंटरही कव्हर केला. न्यायालयात सिद्ध झाले की हा एन्काउंटर खोटा होता. त्यामुळे आरोप सिद्ध होण्याआधी अक्षय शिंदेची हत्या करण्यात आली, जी पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांच्या मृत्यूप्रमाणेच संतापजनक आहे.”
तसेच माने यांनी माध्यमांवर आरोप करत म्हटले की, “मीडिया ज्या वेळी एखाद्याला जबरदस्तीने आरोपी ठरवतो, तेव्हा समजावे की खऱ्या आरोपीला वाचवण्याचा डाव आहे.”
पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “खरे दोषी कोण आहेत हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. मीडिया किंवा सामान्य जनतेने कोणावरही बोट दाखवू नये.” तसेच, “दहशतवादी कपटी आणि कारस्थानी असतात, ते सहज ओळखता येणार नाहीत. उलट जनतेची दिशाभूल करून चुकीच्या लोकांवर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो,” असेही त्यांनी नमूद केले.
किरण माने यांच्या या भूमिकेवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
kiran-mane-mentions-the-alleged-fake-encounter-of-accused-akshay-shinde