Khed Nagarparishad Reservation : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असेल, यावर स्थानिक राजकीय समीकरणं ठरतात, त्यामुळे आजच्या आरक्षण घोषणेकडे राजकीय वर्तुळाची नजर लागली होती.
यात खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद (Khed Nagarparishad) खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहे. यामुळे मनसेतून हकालपट्टी झालेल्या आणि सध्या भाजपमध्ये पक्षप्रवेशासाठी वाट पाहत असलेल्या माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar BJP Aspirant) यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे.
वैभव खेडेकर हे राज ठाकरे (Raj Thackeray MNS) यांचे कोकणातील महत्त्वाचे शिलेदार मानले जातात. ते २०१४ मध्ये दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवले होते, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यापासून वैभव खेडेकर त्यांच्या जवळ होते. खेड नगरपरिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी यापूर्वी खेडचे नगराध्यक्षपद देखील सांभाळले.
अलीकडे वैभव खेडेकर यांची मनसेतून हकालपट्टी झाली होती, मात्र स्थानिक युवा वर्गात त्यांची लोकप्रियता कायम होती. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. गणेशोत्सव काळात भाजप मंत्री नितेश राणे (Nitesh Rane BJP) यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाची तयारी केली. ४ सप्टेंबर रोजी नरीमन पॉईंट, मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan BJP) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार होता, मात्र मराठा आंदोलनामुळे हा पक्ष प्रवेश अद्याप रखडला आहे.
त्यानंतर आता खेड नगरपरिषदेतील नगराध्यक्षपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने, आधीच पक्ष प्रवेश रखडलेल्या वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar BJP Aspirant) यांना आणखी मोठा धक्का बसला आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात गोंधळ निर्माण झाला आहे.






