Kartiki Wari Pandharpur Denagi : पंढरपूर (Pandharpur) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी वारीत वारकऱ्यांनी आपल्या श्रद्धेचं अप्रतिम दर्शन घडवलं आहे. भाविकांनी विठ्ठलाच्या चरणी तब्बल ५ कोटी १८ लाख ७७ हजार २२८ रुपयांचं दान अर्पण केलं आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा देणगीत तब्बल १ कोटी ६१ लाखांहून अधिक वाढ झाली असल्याचं मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा (Mukesh Anecha) यांनी सांगितलं.
विविध माध्यमातून आलेल्या देणग्या
२२ ऑक्टोबरपासून ५ नोव्हेंबरपर्यंत झालेल्या या वारी काळात श्री विठ्ठलाच्या चरणाजवळ ४८ लाख ८ हजार २८९ रुपये अर्पण झाले. भक्तांनी दिलेल्या रोख देणग्या १ कोटी २७ लाख ९१ हजार ५२० रुपयांपर्यंत पोहोचल्या. लाडू प्रसाद विक्रीतून ५४ लाख १६ हजार ५०० रुपये मिळाले, तर भक्तनिवासातून ७१ लाख ५९ हजार ९१० रुपयांचं उत्पन्न झालं.
हुंडीपेटीतून सर्वाधिक म्हणजेच १ कोटी ७७ लाख १५ हजार २२७ रुपये मिळाले. पूजेच्या माध्यमातून ५० हजार रुपये, तर सोनं-चांदी अर्पणातून ३३ लाख ३६ हजार ८७६ रुपये आले. याशिवाय अगरबत्ती, चंदन, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर इत्यादी वस्तूंच्या विक्रीतून आणखी ६ लाख ७० हजार ९०६ रुपये मंदिराच्या खात्यात जमा झाले.
मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल १.६१ कोटींची वाढ
सन २०२४ मध्ये कार्तिकी वारीतून एकूण ३ कोटी ५७ लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. यावर्षी मात्र ५ कोटींचा आकडा पार करत देणगीमध्ये मोठी भर पडली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल १ कोटी ६१ लाख २९ हजार ९०६ रुपयांची वाढ झाल्याचं मंदिर प्रशासनाने स्पष्ट केलं.
लाखो वारकऱ्यांचा सहभाग
आषाढी (Ashadhi) आणि कार्तिकी (Kartiki) या दोन्ही वारींना महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत येणारे हे वारकरी भक्त आपल्या श्रद्धेने संपूर्ण वातावरण भक्तिमय करतात.
आषाढी वारीला राज्याचे मुख्यमंत्री शासकीय महापूजा करतात, तर कार्तिकी वारीला ही जबाबदारी उपमुख्यमंत्र्यांकडे असते. यंदा ही महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते पार पडली.
या वर्षी यात्रा काहीशी लहान असूनही भक्तांच्या देणगीत वाढ झाल्याने मंदिर समिती व स्थानिक प्रशासनाने आनंद व्यक्त केला आहे. ही वाढ भक्तांच्या निष्ठा आणि विठ्ठलप्रेमाचं द्योतक मानली जाते.






