…म्हणून ‘त्या’ बस कंडक्टरनं सोशल मीडियावर विकायला काढली स्वत:ची किडनी

मुंबई | करोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच घटकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या हातचे रोजगार गेले आहेत. तर दुसरीकडे वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा या कठीण परिस्थितीत कुटुंब चालवणे देखील कठीण होऊन बसले आहे.

अशातच एक बातमी समोर येत आहे. कनार्टक राज्य परिवहन कंपनीमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या हनुमंत कालेगर यांनी आपली किडनीच विकायला काढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कालेगर यांचे वय ३८ वर्षे आहे. पुरेसे पैसे मिळत नसल्याने कुटुंबाचे हाल होत आहेत. त्यामुळे आपण किडनी विक्री करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

याबाबत कालेगर यांनी स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहीर केले आहे. ज्यांना किडनी हवी आहे, त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करताना या बस कंडक्टरने स्वत:चा मोबाइल क्रमांकही पोस्ट केला असल्याची माहिती मिळाली आहे.

‘कोरोना साथीच्या काळात माझी आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक खराब झाली. मी परिवहन कंपनीचा कर्मचारी असून माझ्याकडे घराचे भाडे भरण्यासाठी आणि रेशन विकत घेण्यासाठीही पैसे नाहीत. आमच्या पगारामध्ये कपात झाली आहे. त्यामुळे आपणास दैनंदिन खर्च करणे अवघड झाले आहे. म्हणून मी माझी किडनी विक्री करणार आहे,’ असे कालेगर यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, कालेगर यांना मुलांचे शिक्षण, आई- वडिलांचा औषधींचा खर्च यासाठी पैशांची आवश्यकता आहे. आपल्या चौथीच्या मुलाला शिक्षणासाठी आजी- आजोबांकडे पाठविले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा’, भूषणसिंह होळकरांची टीका
पूजा चव्हाण आत्मह.त्येप्रकरणी चर्चेत आलेले संजय राठोड आहेत तरी कोण?
“वाट कसली बघताय? मंत्री संजय राठोडांच्या मुसक्या आवळा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.