“आगे आगे देखो होता है क्या!”; गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर कंगनाने दिला मुख्यमंत्र्यांना इशारा

 

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज राजीनामा दिला आहे.  १०० कोटी वसुली प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अनिल देशमुखांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

राजीनाम्याची माहिती अनिल देशमुखांनी सोशल मीडियामार्फत दिल्यानंतर अभिनेत्री कंगणा राणावताने यावर प्रतिक्रिया दिली आहे, तसेच तिने एक ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

जो साधूंची हत्या करतो आणि स्त्रीचा अपमान करतो, त्याचे पतन निश्चित आहे. ही तर सुरुवात आहे, पुढे बघा आणखी काय काय होतं, असे म्हणत कंगणाने अनिल देशमुखांवर टीका केली आहे. या ट्विटमध्ये तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पण नाव लिहिले आहे.

२०२० मध्ये पालघरमध्ये साधूंना काही लोकांनी मारहाण केली होती. त्यावेळी कंगणाने उघडपणे महाराष्ट्र सरकारवर अनेक आरोप केले होते. त्यामुळे अनिल देशमुख यांनी कंगनाला येथे राहण्याचा काहीही अधिकार नाही, असे म्हटले होते. आता त्याच प्रकरणाचा धागा दोरा धरत कंगणाने अनिल देशमुखांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, ऍड. जयश्री पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या चौकशीची याचिका हायकोर्टात दाखल केली होती, या याचिकेवर निर्णय घेत सीबीआयला १५ दिवसांसाठी प्राथमिक चौकशीची मुदत देण्यात आली आहे.

त्यामुळे आता सीबीआयकडून १५ दिवसांमध्ये परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे. असे असताना आता अनिल देशमुख यांनी स्वतःहून आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.