‘अक्षरशहा’ म्हणून ओळखले जाणारे कमल शेंडगे यांचे मुंबईत निधन

मुंबई | सुप्रसिद्ध अक्षरकार आणि अक्षरशहा म्हणून ओळखले जाणारे कमळ शेंडगे यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी मुंबईत निधन झाले आहे. ते ८५ वर्षांचे होते.

मुलुंड येथे आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुले आणि एक सून असा परिवार आहे.

कमल शेंडगे यांना मुळात चित्रकलेची आवड होती. १९५५ मध्ये त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये नोकरी सुरू केली. त्यानंतर ते अक्षरलेखनाकडे वळाले.

महाराष्ट्र टाइम्स सुरू झाल्यानंतर त्यांनी मराठी अक्षरलेखन सुरू केले. १९६२ साली ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकासाठी त्यांनी पहिल्यांदा अक्षरलेखन केले.

त्यानंतर त्यांनी मत्स्यगंधा, कट्यार काळजात घुसली, पुरुष, नाच ग घुमा, ज्वालामुखी, गुलमोहर अशा हजारो नाटकांचे अक्षरलेखन केले. ही नाटके प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कमल शेंडगे यांचा खूप मोठा वाटा होता.

फिल्मफेअर आणि माधुरी या मासिकांसाठीसुद्धा त्यांनी अक्षरलेखन केलं होतं. तब्बल ५५ वर्षे त्यानी अक्षरांच्या दुनियेत काम केलं. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी काम केलं.

शुक्रवारीही त्यांनी एका पुस्तकाचं अक्षरलेखन केलं होतं. ‘अक्षरांवर प्रेम करा’ असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. कमल शेंडगे यांच्या निधनाने अक्षरांच्या दुनियेतील एक चमत्कार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.