Kalyan Dombivli Mahanagarpalika Election: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के ढासळणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य

Kalyan Dombivli Mahanagarpalika Election: कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli) महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांत भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) यांच्यातील नातं पूर्णपणे तडे जाईल का, अशी चर्चा रंगत आहे. कारण रविवारी झालेल्या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यांनी थेट युती तुटेल असं न सांगता, कमळ चिन्हावर उभ्या राहणाऱ्या उमेदवारांनाच मतदान करण्याची जोरदार विनंती केली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीसह राज्यभरात भाजप आणि शिंदे गटातील वाद आणखी चिघळल्याचं दिसून येत आहे.

रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी भाषणात पक्षांतर, कार्यकर्त्यांची फूट आणि निर्णय प्रक्रियेवर दिलेल्या संकेतांमुळे आगामी KDMC निवडणुकीत भाजप स्वतंत्रपणे उतरणार असल्याची शक्यता अधिकच बळावली आहे. त्यांनी केंद्र आणि राज्यात भाजपचं सरकार असल्याने महापालिकेतही तेच सत्तेत आलं तर विकासकामांना अधिक गती मिळेल, असं सांगितलं. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याने महायुतीतली पडझड स्पष्ट दिसते, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

युतीवरून रवींद्र चव्हाण यांचे थेट संकेत

चव्हाण यांनी भाषणात महायुतीचा थेट उल्लेख टाळला असला तरी, “जो कमळ चिन्हावर उभा राहील त्यालाच मतदान करा,” ही विनंती नेमका संदेश देणारी ठरली. त्यांनी नगरसेवकांच्या कामाचा हवाला देत काहींनी अपेक्षेप्रमाणे काम न केल्याची खंतही व्यक्त केली. विकासकामांसाठी निधी देणे आपलं कर्तव्य आहे पण स्थानिक पातळीवरील कामे नगरसेवकांनी करणे गरजेचे असल्याचं ते म्हणाले.

मनसे नेते प्रकाश भोईर यांच्या प्रवेशाची चर्चा

या कार्यक्रमाला मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर उपस्थित होते. त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार का, अशी चर्चा अधिकच तापली. याबाबत विचारता त्यांनी, “आतापर्यंतचे सर्व निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करुन घेतले आहेत, पुढेही तेच होईल,” असं सूचक विधान केलं. त्यामुळे त्यांच्या राजकीय पावलांबाबत उत्सुकता वाढली आहे.