Solapur Crime: सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) बार्शी तालुक्यातल्या सासुर गावात (Sasur Village) घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मंगळवारी सकाळी एका कारमध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात त्यांनी स्वतःच्या पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पण या घटनेमागे एका नर्तिकेसोबतचे प्रेमसंबंध आणि पैशांसाठीचा दबाव कारणीभूत असल्याचे समोर आलं आहे.
नर्तिकेसोबतचं नातं आणि पैशांची मागणी
गोविंद बर्गे यांची 2024 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv District) एका कला केंद्रात पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) हिच्याशी ओळख झाली. या ओळखीचं नातं पुढे जाऊन प्रेमसंबंधांमध्ये बदललं. वेळोवेळी पूजाने त्यांच्याकडून मोबाईल, सोने, पैसे आणि जमीन घेतली. एवढंच नव्हे तर तिने पावणेदोन लाखांचा मोबाईलही मागून घेतल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.
पण काही दिवसांपासून ती अधिकच दबाव आणू लागली. गेवराई तालुक्यातील (Georai Taluka) बंगला आपल्या नावावर करण्याची आणि भावाच्या नावावर पाच एकर शेती लिहून देण्याची मागणी ती करत होती. यासाठी तिने धमक्या देत सांगितले की, ‘‘नाही मान्य केलं तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन.’’ या धमक्यांनी हैराण होऊन गोविंद यांनी अखेर टोकाचं पाऊल उचलल्याचं नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं.
पोलिसांत गुन्हा दाखल
मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मृताच्या मेहुणे लक्ष्मण चव्हाण (Laxman Chavan) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूजा देविदास गायकवाड हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आत्महत्या आणि खून या दोन्ही अंगांनी सुरू केला आहे.
गाव हादरलं, संशय कायम
गोविंद बर्गे हे गेवराई तालुक्यात लुखामसला गावात (Lukhamasla Village) प्लॉटिंग व्यवसाय करत होते. सोमवारी रात्री ते पूजाच्या घरी गेले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी गावाबाहेर कारमध्ये त्यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. प्रेमसंबंधातून निर्माण झालेलं वितुष्टच या शोकांतिकेचं कारण असल्याचं मानलं जात आहे. मात्र, पोलिसांचा तपास अजून सुरू असून नर्तिकेची भूमिका तपासली जात आहे.