Share

Kabutarkhana Jain Community Dharm Sabha: जैन समाज सर्वात जास्त टॅक्स देतो, आता आमचा नवा पक्ष, कबुतर आमचं पक्षचिन्ह, चादर-फादर सोडून सर्वांना प्रवेश, जैन मुनींची घोषणा

Kabutarkhana Jain Community Dharm Sabha: कबूतरखान्यावरील (Kabutarkhana) वाद आणि आंदोलनामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज (11 ऑक्टोबर) जैन समाजाच्या (Jain Community) वतीने मुंबईतील कबूतरखाना परिसरात धर्मसभा आयोजित करण्यात आली. या धर्मसभेला मोठ्या संख्येने जैन बांधव आणि मुनी उपस्थित होते. धर्मसभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जैन मुनी निलेशचंद्र विजय (Nileshchandra Vijay) यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.

जैन समाजाचा नवा पक्ष – जन कल्याण पार्टी 

मुनी निलेशचंद्र विजय यांनी स्पष्टपणे सांगितले की, “जैन समाज देशात सर्वाधिक कर भरतो, पण आमचं ऐकून घेणारा कोणी नाही. त्यामुळे आम्ही आता आमचा स्वतःचा पक्ष निर्माण करत आहोत – जन कल्याण पार्टी. या पक्षाचं चिन्ह कबूतर असेल.” त्यांनी पुढे सांगितले, “शिवसेनेचं चिन्ह वाघ होतं, तसं आमचं कबूतर आहे. ही फक्त जैनांचीच नव्हे तर गुजराती आणि मारवाडी समाजाची पार्टी असेल.” मुनींनी आणखी स्पष्ट केलं, “आमच्या पक्षात चादर-फादर सोडून सर्व धर्मीयांना प्रवेश असेल. आम्ही कोणालाही बाहेर ठेवत नाही, सर्वांच्या हितासाठी काम करणार आहोत.”

“कबूतरांमुळे महायुती सरकार पडेल” – निलेश मुनी

मुनी निलेशचंद्र विजय यांनी यावेळी सत्ताधारी महायुती सरकारवर (Mahayuti Government) टीका करत सांगितले, “कबूतरांमुळे हे सरकार जाईल. कांद्यामुळे काँग्रेसचं सरकार गेलं होतं, आता कबूतरांमुळे महायुतीचं सरकार जाणार आहे.”
शिवसेना (Shiv Sena) नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांच्यावरही त्यांनी टीका केली. “त्या कोण आहेत हे मला माहीत नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सांगतो, त्या ज्या वेड्या झाल्या आहेत त्यांना आवरा,” असं निलेश मुनी म्हणाले.

“डॉक्टर मूर्ख आहेत, कबूतर शांततेचं प्रतीक” – कैवल्य रत्न महाराज 

या धर्मसभेत जैन मुनी कैवल्य रत्न महाराज यांनीही जोरदार भाषण केलं. त्यांनी सांगितले, “कबूतर शांततेचा प्रतीक आहे. आमचा धर्म सांगतो की दुसऱ्यांसाठी मरायला हरकत नाही. रावणासमोर जटायू उभा राहिला, त्या दिवसापासून पक्ष्यांचं महत्त्व आहे.” डॉक्टरांवर भाष्य करत त्यांनी वादग्रस्त विधान केलं, “मी डॉक्टरांना मूर्ख मानतो. एक-दोन कबूतर मेल्याने काही फरक पडत नाही. दररोज सामान्य माणूस मरतो, त्याचं कोण विचार करतं?” त्यांनी पुढे म्हटलं, “मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) आज धर्मसभेला आले नाहीत, ही सरकारची मिलीभगत आहे.”

या धर्मसभेच्या माध्यमातून जैन समाजाने कबूतरखाना प्रकरणावर आपली ठाम भूमिका मांडली. आता ‘जन कल्याण पार्टी’च्या घोषणेमुळे जैन समाज राजकारणात थेट पाऊल टाकत आहे.

 

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now