“गुजरातमध्ये पत्रकारांना अटक झाली, उत्तर प्रदेशात मुडदे पाडले तेव्हा आणीबाणीची आठवण झाली नाही”

मुंबई । राज्यात अर्णब गोस्वामीच्या अटकेवरून राजकारण पेटले आहे. यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात वाद पेटले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ट्विट करून आणीबाणीचा उल्लेख केला आहे.

यावरून आता शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. “चौथा स्तंभ कोसळला असे सांगणारे लोकशाहीतील पहिल्या स्तंभास उखडू पाहत आहेत” अशी टीका आता शिवसेनेने भाजपवर केली आहे. अर्णब गोस्वामी यास एका खासगी प्रकरणात अटक झाली. त्याच्या अटकेचा राजकारणाशी, पत्रकारितेशी संबंध नाही.

हे रामराज्यच आहे, एका नौटंक्यासाठी छाती बडवणे बंद करा. आता चौकशीत काय ते सत्य बाहेर येईल. यात ‘आणीबाणी’ आली, काळा दिवस उजाडला, पत्रकारितेवर हल्ला झाला, असे काय आहे? अर्णब गोस्वामी व त्यांची वृत्तवाहिनी कोणत्या प्रकारची पत्रकारिता करते? व त्यांच्या बरळण्यामागे कोणाची फूस आहे हे जगजाहीर आहे.

गोस्वामी यांनी महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर प्रमुख नेत्यांच्याबाबत गरळ ओकली म्हणून त्यास अटक झालेली नाही. त्याचा संबंध एका मृत्यू प्रकरणाशी जोडला आहे व मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून ही कारवाई आहे.

त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केल्याप्रमाणे ही अटक म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला वगैरे अजिबात नाही. गुजरातमध्ये सरकारविरोधी लिहिणाऱ्या संपादकांना अटका झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात पत्रकारांचे मुडदे पाडले गेले तेव्हा कोणाला आणीबाणीची आठवण का झाली नाही?

लालकृष्ण आडवाणी हयात आहेत व आणीबाणी काय होती हे त्यांच्याकडून समजून घेतले पाहिजे. अशी जोरदार टीका शिकसेनेने भाजपवर केली आहे. हे प्रकरण अजून चिघळण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.