Babita Pahadiya : संघर्ष आणि जिद्द जर सोबत असेल, तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्नं पूर्ण होतात, याचं उत्तम उदाहरण बबिता पहाडिया (Babita Pahadiya) हिने घालून दिलं आहे. झारखंड लोकसेवा आयोगाच्या (Jharkhand Public Service Commission) परीक्षेत यश मिळवत ती अधिकारी बनली. पण घरची आर्थिक परिस्थिती एवढी हलाखीची होती की, निकाल लागल्याच्या दिवशीही घरात पेढे आणण्यासाठी पैसे नव्हते. अशावेळी आईने साखर तोंडात घालून मुलीच्या यशाचा गोड सोहळा साजरा केला.
आदिवासी समाजातून अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास
दुमका (Dumka) जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाड्यात वाढलेली बबिता एका अशा समाजातून आली जिथे लोकांचा उदरनिर्वाह शेती, शिकार आणि जंगलातून मिळणाऱ्या साधनांवरच चालतो. तिचे वडील एका खासगी शाळेत शिपाई, आई गृहिणी तर भाऊ पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करतो. घरात चार भावंडं असल्याने आणि आर्थिक ओढाताण कायम असल्याने वडिलांनी तिला लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला.
पण बबिताने तो सल्ला नाकारला. “सरकारी अधिकारी झाल्याशिवाय लग्न करणार नाही” असा निर्धार करून तिने अभ्यासाला वाहून घेतलं. समाजातील टोमणे, नातेवाईकांच्या बोलण्या-सुनण्याला उत्तर न देता ती सतत अभ्यास करत राहिली.
२५ जुलैला जेपीएससी निकाल लागला आणि बबिताने राज्यात ३३७ वा क्रमांक पटकावत अधिकारीपद मिळवलं. घरात आनंदाचे ढग दाटले, पण पेढे आणायला पैसे नव्हते. अशावेळी आईने प्रेमाने साखर देऊन लेकीचं तोंड गोड केलं. नंतर शेजाऱ्यांनीही साखर वाटून हा आनंद साजरा केला.
बबिता ज्या पाड्यात राहते तिथे अजूनही पक्का रस्ता नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही. आता ती अधिकारी झाल्यानंतर आपल्या समाजासाठी काम करण्याचं स्वप्न बाळगते आहे. विशेषतः पाड्यातील मुलींना शिक्षण घेऊन मोठं व्हावं, यासाठी ती प्रयत्नशील राहणार आहे.