Jayant Patil & Gopichand Padalkar: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Faction) वरिष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अखेर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या सततच्या टीकेला अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं आहे. इस्लामपूर (Islampur) येथे आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी पडळकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर संतप्त प्रतिक्रिया दिली.
गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याने निर्माण केला गदारोळ
काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरले होते. या वक्तव्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पडळकरांना बोलावून समज दिल्याचं समजतं. तरीही पडळकरांनी टीका थांबवली नाही. जयंत पाटील यांच्यावर त्यांनी पुन्हा जहरी भाषेत टीका केली, पण पाटील मात्र आतापर्यंत शांत राहिले होते. त्यामुळे त्यांच्या पुढील पावलांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
‘वेळ येईल तेव्हा उत्तर मिळेल’
या पार्श्वभूमीवर इस्लामपूर येथे झालेल्या मुलाखतीत जयंत पाटील म्हणाले, “वेळ आल्यावर योग्य उत्तर दिलं जाईल, तोपर्यंत थांबा. टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करेक्ट होणारच.” पुढे ते म्हणाले, “आपलं नाव ऐकलं नाही असं एकही गाव नाही, आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही.” त्यांच्या या विधानावर उपस्थितांमध्ये जोरदार जल्लोष झाला.
‘चौकशी करा, पण बोलू नका’
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, “माझ्याविरोधात सगळ्यांनी मिळून चौकश्या मागितल्या, आरोप केले. पण मला काही फरक पडत नाही. फक्त बोलू नका, माझी चौकशी करा.” त्यांनी पुढे सांगितले की, “एका व्यक्तीने माझ्या आईवडिलांबद्दल अश्लाघ्य भाषा वापरली, आणि त्याच्याच समर्थनासाठी भाजपमध्ये सभा घेतल्या गेल्या. अशा प्रकारचा नीचपणा मी आधी कधी पाहिला नव्हता. त्यामुळे आमच्या भागातील लोकांची भावना दुखावली गेली आहे.”
या सर्व घटनांवर त्यांनी निवडणुकीत मतदार योग्य उत्तर देतील असा विश्वास व्यक्त केला. “हे सगळं जाणूनबुजून केलं जातंय. पण जनतेला सगळं समजतं. हे लोक मतपेटीतूनच प्रत्युत्तर देतील,” असं ते म्हणाले.
त्यांच्या शांततेबद्दल विचारले असता पाटील म्हणाले, “मी प्रदेशाध्यक्ष असताना मतदारसंघातील लोकांना भेटता येत नव्हतं. पण आता जबाबदारी नसल्याने मी थेट जनतेत जातोय. लोकांना भेटतोय, त्यांचे प्रश्न ऐकतोय.” जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पडळकरांच्या सततच्या टीकेला एक ठाम आणि सूचक प्रत्युत्तर दिलं गेलं, असं मानलं जातं.