Sharad Pawar : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “माण-खटावच्या लोकांनी बारामतीच्या पवारांवर भरभरून प्रेम केलं, मात्र त्याच बारामतीच्या लोकांना पहिल्यांदा धक्का बसला. कारण एका सामान्य कुटुंबातील, रेशनिंग दुकानदाराच्या मुलाने आमदारकी मिळवली आणि तेच पवारांना खुपलं,” असा घणाघात जयकुमार गोरे यांनी केला.
“मी बारामतीच्या पुढे झुकलो असतो, तर…”
माण तालुक्यातील आंधळी येथे आयोजित कार्यक्रमात जयकुमार गोरे बोलत होते. त्यांनी स्पष्ट केलं की, “माझा विरोध बारामतीला किंवा पवारांना नाही, पण ज्यांनी माण-खटाव तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवलं, त्यांना माझा विरोध आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “मी जर बारामतीसमोर झुकलो असतो, तर माझी आमदारकी सोपी झाली असती. मात्र त्यामुळे आपल्या तालुक्याला पाणी मिळालं नसतं. म्हणून मी त्यांची गुलामगिरी स्वीकारली नाही.”
“माझ्या विरोधकांनी जादूटोणा केला तरी फरक पडणार नाही”
जयकुमार गोरे यांनी आपल्या राजकीय प्रवासातील संघर्षांवरही भाष्य केलं. “माझ्या विरोधात संपूर्ण जिल्हा आणि राज्य रोज नदीकिनारी जाऊन पूजा करतो, काळ्या बाहुल्या रोवतो. साध्या घरातलं पोरगं तीन वेळा आमदार झालं, प्रत्येक निवडणुकीत माझ्यावर केस झाल्या, पण मी कधीही थांबलो नाही. कितीही दडपशाही करा, पण जोपर्यंत जनता माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत कोणीही मला रोखू शकत नाही,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी विरोधकांना इशाराही दिला, “मी कोणाच्या नादाला लागत नाही, आणि माझ्या नादाला कोणी लागू नये. सावज टप्प्यात आल्याशिवाय मी कधी हात लावत नाही. आता सावज टप्प्यात आलंय, थोडी वाट बघा!”
वडूज नगराध्यक्षपदी रेशमा बनसोडे यांची बिनविरोध निवड
दरम्यान, *वडूज नगरपंचायतीच्या मावळत्या नगराध्यक्षा मनिषा काळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदावर भाजपच्या रेश्मा श्रीकांत बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला.