Janhvi Kapoor on Kalyan Assault: कल्याण (Kalyan East) परिसरात दोन दिवसांपूर्वी एका मराठी तरुणीवर झालेल्या मारहाणीची घटना समोर येताच ती सोशल मीडियावर चांगलीच गाजू लागली आहे. नांदिवली (Nandivali Clinic) भागातील एका खाजगी क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वसामान्यांसह बॉलिवूडमधूनही तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिनं या घटनेबाबत संताप व्यक्त करत समाजातील उदासीनतेवर जोरदार सवाल उपस्थित केला आहे.
“लाज वाटायला हवी!”
या प्रकरणात प्रतिक्रिया देताना जान्हवीने थेट शब्दांत आरोपीच्या वागणुकीचा निषेध केला. ती म्हणाली, “हा माणूस तुरुंगात गेला पाहिजे. कुणी या वर्तनाचं समर्थन करत असेल, तर त्यांनाही लाज वाटली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, एखाद्यावर सहज हात उचलता येतो? कोणत्या संगोपनामुळे एखादा माणूस पश्चात्तापाशिवाय, अपराधीपणाच्या भावनेशिवाय असं काही करू शकतो?”
जान्हवी पुढे म्हणाली, “आपण मानवतेच्या भावना हरवून बसलो आहोत का? शिक्षा झालीच पाहिजे, कारण जर आपण अशा वागण्याला क्षमा करतो, तर आपणही दोषीच. ही कृती इतकी लाजिरवाणी आहे की, त्यावर समाज म्हणूनही आपण विचार करणं गरजेचं आहे.”
गोकुळ झा अटकेत
या प्रकरणात आरोपी गोकुळ झा (Gokul Jha) याला अखेर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. तो याआधी एका गुन्ह्यात शिक्षा भोगून नुकताच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. नांदिवली परिसरात त्याच्या लपण्याची माहिती मिळताच नागरिक आणि मनसे (MNS) कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याचा भाऊ रणजित झा (Ranjit Jha) यालाही चौकशीसाठी घेतलं आहे.
पोलिस उपायुक्त अतुल झेंडे (Atul Zende) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ झा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर आधीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.