Jalgaon : जळगावमध्ये ठाकरे गटाचे तीन उमेदवार नॉट रिचेबल, उमेदवारी मागे घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून किडनॅप, ठाकरे गटाचा दावा

Jalgaon : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात राजकीय वातावरण तापलं आहे. युती-आघाड्यांच्या गणितांमध्ये सत्ताधारी दबाव वाढल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गट (ShivSena) कडून करण्यात आला आहे. जळगाव शहर (Jalgaon) येथे उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी धाकदपटशा, प्रलोभन आणि थेट किडनॅपसारखे प्रकार घडत असल्याचा दावा संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी केला आहे. या कथित प्रकारांमुळे ठाकरे गटाचे तीन उमेदवार सध्या नॉट रिचेबल असल्याचं सांगण्यात आलं.

या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नॉट रिचेबल असलेल्या उमेदवारांच्या सुरक्षिततेबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली असून, त्यांच्या बरे-वाईटाची भीतीही सावंत यांनी उघडपणे बोलून दाखवली आहे. महायुतीचा उमेदवार बिनविरोध व्हावा, यासाठी दबाव तंत्र वापरलं जात असल्याचा आरोप करत “बिहार पॅटर्न” राबवला जात असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

बेपत्ता उमेदवारांबाबत भीती, दबावाचे आरोप

या प्रकरणात ठाकरे गटाचे पर्वताबाई भिल, सागर पाटील यांच्यासह आणखी एक उमेदवार बेपत्ता असल्याचा दावा करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज माघारीसाठी जबरदस्ती होत असल्याने निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागत असल्याचं चित्र असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित उमेदवारांशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

महापालिका निवडणुकीत बिनविरोध निकालांची चर्चा

जळगाव महापालिका निवडणुकीत काही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपचा एक आणि शिवसेना शिंदे गटाचे तीन उमेदवार बिनविरोध झाल्याचं समोर आलं आहे. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे पुत्र गौरव सोनवणे यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज माघारी गेल्याने ते बिनविरोध निवडून आल्याचं चित्र आहे.

निष्पक्ष चौकशीची मागणी

उमेदवारी माघारी घेणारा उमेदवारही नॉट रिचेबल असल्याचा आरोप करण्यात आला असून, अजूनही तीन उमेदवारांशी संपर्क होत नसल्याचा दावा कायम आहे. दबाव, धमकी आणि कथित किडनॅपसारख्या आरोपांमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर संशयाचं सावट पसरलं आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावं, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.