याला म्हणतात झटका! भारतातील बंदीमुळे टिकटॉकचे तब्बल ६ अब्ज डॉलर्सचे नुकसान होणार

 

नवी दिल्ली। भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्र सरकारने टिकटॉकसह इतर ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. या बंदीमुळे चीनला आर्थिक फटका बसणार की नाही याबाबत बरीच चर्चा सुरू आहे.

अशात चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने या बंदीमुळे टिकटॉकची मालकी असलेल्या ByteDance या कंपनीचे मोठे नुकसान होणार असल्याचे म्हंटले आहे.

“भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सीमेवर झालेल्या संघर्षानंतर भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्स बॅन केले आहेत. यामुळे टिकटॉकची मदर कंपनी असलेल्या ByteDance ला ६ अब्ज डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता आहे”, अशी माहिती ग्लोबल टाइम्सने ट्विटरद्वारे दिली आहे.

टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयाची अमेरिकेतही दखल घेण्यात आली आहे. काही अमेरिकी खासदारांनी अमेरिकन सरकारला भारतासारखाच निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

“मागच्या आठवडयात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी चीन सरकार आपल्या फायद्यासाठी टिकटॉकचा वापर करत आहे, असा आरोप केला होता. अमेरिकेत जवळपास टिकटॉकचे ४ कोटी वापरकर्ते आहेत.

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींचा आधार घेत ही कारवाई केली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ‘६९अ’ मधील तरतुदींचा आधार घेत ५९ अ‍ॅपवर बंदी आणण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.