Homeताज्या बातम्या८३०० किमीचा प्रवास, जंगलात लपला, पार्कमध्ये रात्र काढल्या; आज तोच बनला सर्वोत्तम...

८३०० किमीचा प्रवास, जंगलात लपला, पार्कमध्ये रात्र काढल्या; आज तोच बनला सर्वोत्तम गोलंदाज

आयर्लंडचा ऑफस्पिनर मुझमिल शेरझादचा अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे, पण त्याचा आतापर्यंतचा प्रवास हा सामान्य नव्हता. अफगाणिस्तानातील जलालाबादच्या रस्त्यांवर टेप बॉलने क्रिकेट खेळणारा मुझामिल आता क्रिकेट जगतातील सर्वोत्तम कनिष्ठ खेळाडूंपैकी एक आहे. त्याचा आतापर्यंतचा प्रवास इतका संघर्षमय आहे की त्याच्या प्रवासावर आरामात चित्रपट किंवा वेब सिरीज बनवता येऊ शकते.

पाच वर्षांपूर्वी शेरझाद १४ वर्षांचा असताना त्याच्या आईने त्याला आयर्लंडला नेण्यासाठी एका व्यक्तीला पैसे दिले. तिथे त्याचे काका फास्ट फूडच्या दुकानात काम करायचे. शेरझादने जलालाबाद सोडले तेव्हा त्याच्याकडे फक्त घरातील काही जेवण आणि सुमारे ३४०० रुपये होते.

यानंतर, पुढील ८-९ महिन्यांसाठी, शेरझादने इतर स्थलांतरितांसह पाकिस्तान, इराण, तुर्की, बल्गेरिया, सर्बिया, क्रोएशिया, इटली आणि फ्रान्सच्या सीमा ओलांडल्या. या दरम्यान त्याला खुप चालला, पळाला, जंगलात लपला, तिथे झोपलाही. शेरझादने आपल्या काकांसह चांगल्या आयुष्याच्या शोधात सुमारे ८३०० किमी प्रवास केला.

आयर्लंडला पोहोचल्यानंतर शेरझादला समजले की क्रिकेट खेळून त्याला आपली ओळख आणि मित्र बनवण्याची संधी मिळेल. त्यामुळे त्याने संघात स्थान मिळवण्यासाठी जिद्दीने प्रयत्न सुरु केला. त्याला नशिबाचे वरदान लाभले आणि आज तो आयर्लंडचा स्टार खेळाडू बनला आहे.

जॉर्जटाउन, गयाना येथून इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना शेरझाद म्हणाला, मी वयाच्या ५ व्या वर्षी माझे वडील गमावले. कौटुंबिक मालमत्तेच्या वादानंतर, माझी आई एका एजंटच्या संपर्कात आली, त्या एजंटच्या माध्यमातून ती मला आयर्लंडला पाठवणार होती. सध्या शेरझाद वेस्ट इंडिजमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये आहे, पण क्रोएशिया ओलांडताना त्याला एका कॅम्पमध्ये थांबावे लागले होते. तेथून इटलीला जाण्यासाठी त्याने तीन-चार दिवस ट्रकने प्रवास केला.

शेरझाद म्हणतो की सुदैवाने शेवटी तो आयर्लंडला पोहोचला पण त्रास संपला नाही. डब्लिनमध्ये त्याने पहिली रात्र एका उद्यानात घालवली कारण काका कुठे राहतात हे त्याला माहीत नव्हते. शेरझादला इंग्रजी बोलता येत नसल्याने पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळाली. तो एका आशियाई माणसाला भेटला ज्याने डब्लिनमधील निर्वासित केंद्राचा पत्ता दिला. काका सापडेपर्यंत त्याला अनाश्रामात राहावे लागले होते.

यानंतर शेरझादने आपल्या काकांसोबत राहायला सुरुवात घेतली. अशात एकेदिवशी त्याने क्रिकेटबद्दलची एक जाहिरात बघितली आणि तिथूनच त्याला क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाली. त्याने क्रिकेट किट खरेदी करण्यासाठी फास्ट फूड आउटलेटमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

वीरेंद्र सेहवागचा डाय-हार्ड फॅन आणि बॉलीवूडचा चाहता शेरझाद वर्ल्ड कपवर नाव कमावण्याच्या तयारीत आहे. आयपीएलबद्दल जाणून घेतल्यानंतर आयपीएलमध्ये खेळण्याचीही त्याची उत्सुकता वाढली आहे. आमिर खानचा ३ इडियट्स सारख्या चित्रपटातून त्याने हिंदी शिकले आहे.

विश्वचषक खेळूनही त्याची एक इच्छा अपूर्ण आहे. त्याला त्याचे कुटुंब, आई, दोन भाऊ आणि एक बहीण यांना भेटायचे आहे. तो म्हणाला, मी विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडकडून क्रिकेट खेळेन असे कधीच वाटले नव्हते. माझी आई आणि भावंडांनी मला खेळताना पाहावे असे मला वाटते. मला त्यांची खूप आठवण येते. मी त्यांना आयर्लंडला आणण्याचा प्रयत्न करत आहे. मी त्याच्या व्हिजासाठी अर्ज केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
५० ते ९० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देताय ‘हे’ पाच शेअर्स; एकाच आठवड्यात गुंतवणूकदार होतोय लखपती
पुण्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक कारण आले समोर
‘मांजरेकर हे मराठी चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ, जे काही बोलायचं असेल ते चित्रपट बघून ठरवा’