Homeताज्या बातम्या...तर मुंबईत लॉकडाऊन होणार; मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग यांचे मोठे वक्तव्य

…तर मुंबईत लॉकडाऊन होणार; मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग यांचे मोठे वक्तव्य

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुंबईतील वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ज्या दिवसापासून मुंबईत दररोज २० हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण भेटू लागतील, त्याच दिवसापासून मुंबईत तात्काळ लॉकडाऊन होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

३ जानेवारी रोजी मुंबईत ८ हजार ८२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ६२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २ जानेवारीलाही ८ हजार ६३ कोरोना रुग्ण आढळले. यावर बोलताना इकबाल सिंग चहल म्हणाले की, मुंबईत कोरोनाचा संसर्ग असाच वाढत गेला आणि एका दिवसात रुग्णांच्या संख्येचा आकडा २० हजारांची मर्यादा ओलांडू लागला, तर लॉकडाऊन लागू करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये नमूद केले आहे की, देशातील विविध राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करायचा की नाही हे बेडची उपलब्धता, ऑक्सिजनची मागणी आणि कोरोना पॉझिटिव्ह दर यावरून ठरवण्यात येणार आहे.

तसेच अशा परिस्थितीत इकबाल सिंग चहल हे मुंबईबाबत सावध झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत, मुंबई महापालिकेच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठीच्या व्यवस्थेचे कौतुक करण्यात आले. पण आता कोरोना संसर्गासोबतच ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या आता सातत्याने ८ हजारांच्या पुढे जात आहे. यावर इकबाल सिंग चहल म्हणाले, महापालिकेकडे कोरोना रुग्णांसाठी ३० हजारांहून अधिक खाटा उपलब्ध आहेत. त्यापैकी तीन हजार खाटा भरल्या आहेत. औषधे आणि व्हेंटिलेटर देखील उपलब्ध आहेत. कोरोनाला तोंड देण्यासाठी आमची तयारी पूर्ण झाली आहे.

३ जानेवारी रोजी महाराष्ट्रात कोरोनाचे १२ हजार १६० नवे रुग्ण आढळून आले. याशिवाय महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे ६८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४० ओमिक्रॉन प्रकरणे एकट्या मुंबईत आढळून आली आहेत. यानंतर पुण्यात १४ प्रकरणे समोर आली आहेत. नागपुरात ४ नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ५७८ ओमिक्रॉन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी २५९ रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या म्हणण्यानुसार, ज्या दिवशी राज्यात ऑक्सिजनची मागणी दररोज ७०० मेट्रिक टन येण्यास सुरुवात होईल, त्या दिवसापासून महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात येईल. ते पुढे म्हणाले की, अशी स्थिती सध्या राज्यात आलेली नाही. निर्बंध आणखी कडक केले जाऊ शकतात परंतु पुन्हा संपूर्ण लॉकडाऊनची वेळ आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-
मास्क न घातल्यास ५०० रूपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रूपये दंड- अजित पवार
कुटुंबापेक्षा शिवसेनेला जास्त महत्व देणाऱ्या शिवसैनिकाने केली आत्महत्या, कारण वाचून डोळे पाणावतील
शेअर मार्केटमधून कमाई करायची तर ‘या’ पाच गोष्टी लक्षात ठेवा; zerodha च्या संस्थापकांनी दिल्या खास टिप्स