Share

Narendra Modi : ‘सत्ता असताना त्यांनी घुसखोरांना…’; काँग्रेसवर नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी आसामच्या दौऱ्यात काँग्रेसवर (Congress Party) घणाघाती टीका केली. “भारताच्या सीमाभागात जाणूनबुजून लोकसंख्येचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न होत आहे. हे कारस्थान राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे. मात्र, भाजप (BJP Party) सरकार कधीही बेकायदा घुसखोरांना देशाच्या साधनसंपत्तीवर कब्जा करू देणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.

मोदींनी स्पष्ट सांगितले की, शेतकरी, तरुण आणि आदिवासी समाजाचे हक्क घुसखोरांना कधीही हिरावून घेऊ दिले जाणार नाहीत. दारांग येथील सभेत त्यांनी स्वातंत्र्यदिनी दिलेल्या ‘डेमोग्राफी मिशन’च्या संदर्भाचा उल्लेख करत विरोधकांवर हल्ला चढवला. “विरोधक हेच घुसखोरांचे संरक्षण करत आहेत. देशाची एकात्मता अबाधित राखण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. घुसखोरांच्या पाठिशी उभ्या राहणाऱ्या राजकारण्यांनी पुढे येऊन उत्तर द्यावे. आम्ही जसे प्रयत्न केले तसे त्यांनी काय केले हे देशाला दाखवावे. घुसखोरांना आश्रय देणाऱ्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. देश त्यांना कधीही माफ करणार नाही,” अशी कठोर भूमिका मोदींनी घेतली.

या दौऱ्यात मोदींनी विकास प्रकल्पांचीही घोषणा केली. दारांग जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जीएनएम शाळा, बी.एस्सी. नर्सिंग कॉलेज यांच्या कोनशिला त्यांनी बसवल्या. गुवाहाटी रिंग रोड प्रकल्पाचे भूमिपूजन आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील कुरवा-नरेंगी पुलाची कोनशिला देखील मोदींच्या हस्ते झाली. याशिवाय बायोइथेनॉल व पॉलिप्रॉपलीन प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली.

गुवाहाटी (Guwahati Assam) येथील सभेत त्यांनी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. “काँग्रेसने दशकानुदशके आसामवर सत्ता गाजवली, पण राज्याचा विकास घडवून आणण्यात अपयश आले. उलट, त्यांनी घुसखोरांना आसरा दिला आणि त्यामुळे राज्याला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले,” असा गंभीर आरोप मोदींनी केला.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now