Nitesh Rane : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के टॅरिफमुळे देशातील कोळंबी निर्यात उद्योगाला मोठा फटका बसत आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, त्यामुळे अमेरिकेने भारतावर हा टॅरिफ लादल्याची माहिती आहे. यामुळे भारतीय बाजारपेठेवरही या टॅरिफचा नकारात्मक परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोळंबी निर्यात करणाऱ्या उद्योगाला गंभीर संकटात सापडल्यामुळे सीफूड एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEAI) यांनी केंद्र सरकारकडे तातडीने आर्थिक मदत मागितली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मत्स्य उत्पादकांना आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, या कठीण काळात भारतीयांनी कोळंबी खाण्याचे प्रमाण वाढवावे. या संकटात भारतीय उत्पादनाला अधिक मागणी मिळेल आणि निर्यात अवलंबून असलेल्या उद्योगाला काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.
नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, पूर्वी भारतातून कोळंबी निर्यातीवर १६ टक्के कर लागू होता, जो आता ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे ६० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे भारताला नवीन बाजारपेठा शोधाव्या लागतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह सरकार या समस्येवर लक्ष ठेवून मार्ग शोधत आहे, परंतु तोपर्यंत मत्स्य उत्पादकांनी निराश होऊ नये आणि आपल्या कामावर भर द्यायला हवे, असेही त्यांनी नमूद केले.
सध्या अमेरिकेने कोळंबीच्या निर्यातीवर लादलेल्या शुल्कामुळे २ अब्ज डॉलर्सच्या उद्योगाला धोका निर्माण झाला आहे. २०२४ मध्ये भारताने अमेरिकेला २.८ अब्ज डॉलर्स मूल्याची कोळंबी निर्यात केली होती, तर २०२५ मध्ये आतापर्यंत ५०० दशलक्ष डॉलर्सची निर्यात झाली आहे. त्यामुळे या टॅरिफमुळे देशाच्या निर्यातीत मोठी घट झाली आहे.