Indian Man beheaded in america Donald Trump reatcion : अमेरिकेत परदेशी नागरिकांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. टेक्सास (Texas) राज्यातील डलास (Dallas) शहरात नुकताच घडलेला एक थरारक प्रकार भारतीय समुदायाला हादरवून गेला. मूळ कर्नाटकातील (Karnataka) चंद्र नागमल्लैया (Chandra Nagamallaiah) या भारतीय नागरिकाची निघृण हत्या करण्यात आली. या हत्येत आरोपीने इतका क्रूरपणा दाखवला की नागमल्लैयांचं शीर धडापासून वेगळं करून त्याचा फुटबॉलप्रमाणे लाथाड केला. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला असून, पाहणाऱ्यांचे मन सुन्न झाले आहे.
ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
या धक्कादायक हत्याकांडावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ‘ट्रुथ’ (Truth Social) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की, आरोपीविरोधात प्रथम श्रेणीचा खटला चालवला जाणार असून, कायद्यानुसार शक्य तितकी कठोर शिक्षा केली जाईल. तसेच बेकायदेशीर स्थलांतरित गुन्हेगारांविरोधात आता कोणतीही नरमाई दाखवली जाणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
बायडेन धोरणांवर टीका
या प्रकरणाच्या निमित्ताने ट्रम्प यांनी पुन्हा एकदा माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी स्पष्ट केलं की, अमेरिकेत अवैध स्थलांतर वाढण्यामागे आणि गुन्हेगारांवर योग्यवेळी कारवाई न होण्यामागे बायडेन यांची उदारमतवादी धोरणं जबाबदार आहेत. जर आरोपीला वेळेत देशाबाहेर काढलं असतं, तर नागमल्लैयांचा जीव गेला नसता, असा दावा ट्रम्प यांनी केला.
आरोपी कोण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करणारा योर्डानिस कोबोस-मार्टिनेज (Yordanis Cobos-Martinez) हा क्यूबा (Cuba) देशाचा रहिवासी असून तो बेकायदेशीररित्या अमेरिकेत राहत होता. त्याच्या नावे पूर्वीचेही गंभीर गुन्हे – लैंगिक अत्याचार आणि चोरीसंबंधी नोंदी आहेत. घटनेनंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोबोसला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
कुटुंबाला मदत
या घटनेनंतर भारतीय दूतावासाने मृत नागमल्लैया यांच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. त्याचबरोबर गो फंड मी (Go Fund Me) या प्लॅटफॉर्मवरून जवळपास २ लाख डॉलर्सची मदत जमा करण्यात आली. नागमल्लैया यांच्यावर १३ सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार पार पडले.