India : ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या निर्णायक कारवाईनंतर भारताने पाकिस्तानसमोर आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले की, “युद्धात पराभव झाल्यानंतरही विजयाचे ढोल वाजविणे ही त्यांची जुनी सवय आहे, परंतु आता वास्तव स्वीकारावे लागेल.” भारताने पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, पाकिस्तानने बळकावलेला पाकव्याप्त काश्मीर (PoK) भारताला परत करावा, हाच आमचा उद्देश असून त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील.
द्विपक्षीय चर्चेवर भारताचा भर
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काश्मीर प्रश्नावर भारताची भूमिका स्पष्ट केली.
त्यांनी सांगितले, “काश्मीरचा प्रश्न हा द्विपक्षीय चर्चेतूनच सुटावा, हीच भारताची भूमिका आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही.”
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीची सूचना दिल्यानंतर जयस्वाल यांनी स्पष्ट उत्तर दिलं की, “भारत कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला मान्यता देत नाही.”
अण्वस्त्र धमक्यांवर भारताचा कडक पवित्रा
जयस्वाल म्हणाले, “भारत अण्वस्त्र हल्ल्यांच्या धमक्यांना भीक घालणार नाही. अशा धमक्यांमुळे घडणाऱ्या दहशतवादी कृत्यांनाही भारत सहन करणार नाही.” पाकिस्तानकडून सातत्याने अण्वस्त्र शस्त्रांच्या धमक्या दिल्या जात असताना भारताने आपली लष्करी व रणनीतिक ताकद दाखवून दिली आहे.
ऑपरेशन सिंदूर : पाकिस्तानसाठी धक्का, भारतासाठी निर्णायक यश
७ मे रोजी सुरू झालेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने पाकिस्तानच्या नियंत्रणातील अण्वस्त्र साठवणूक केंद्रांवर लक्ष केंद्रित करत उच्च-तंत्रज्ञानाचा वापर करून जोरदार हल्ला केला. त्यानंतर १० मे रोजी शस्त्रसंधी झाली. या कारवाईमुळे पाकिस्तानच्या अणुक्षमता व लष्करी नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
व्यापार चर्चा नव्हती – परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा
या काळात भारत व अमेरिका यांच्यात लष्करी व सुरक्षा विषयांवर चर्चा झाली. मात्र, काही वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेल्या अंदाजांनुसार व्यापारविषयक चर्चेची अफवा फेटाळताना जयस्वाल म्हणाले, “या संपूर्ण कालावधीत व्यापार विषयावर कोणतीही चर्चा झालेली नाही.” तसेच त्यांनी स्पष्ट केलं की, “जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला समर्थन देतो, तोपर्यंत सिंधू जल कराराला भारताने दिलेली स्थगिती कायम राहील.”
पाश्चिमात्य विश्लेषकांचाही भारताच्या बाजूने सूर
ऑस्ट्रियन लष्करी इतिहासकार टॉम कूपर यांनी ऑपरेशन सिंदूरला भारताचा “स्पष्ट आणि निर्णायक विजय” म्हणून संबोधले आहे. आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “जर आपण दुसऱ्याच्या अण्वस्त्र साठवणुकीवर यशस्वी हल्ले करत असू आणि समोरून प्रत्युत्तर देण्याची क्षमताही नसेल, तर त्याहून मोठा विजय काय असू शकतो?”
त्यांनी पाश्चिमात्य माध्यमांची टीका करताना म्हटले, “पाकिस्तानला संधी देण्याच्या नादात अनेक वेळा तिथे वास्तव झाकले जाते. पण ऑपरेशन सिंदूरने भारताची लष्करी तयारी, धोरणात्मक बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कडक भूमिका अधोरेखित केली आहे.”
भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूरने केवळ सामरिक नव्हे तर कूटनीतिक विजयही भारताच्या नावावर नोंदवला आहे. पाकिस्तानने याचे वास्तव स्वीकारून पुढील कारवायांपासून दूर राहणेच त्याच्याच हिताचे ठरणार आहे. भारत मात्र आपले उद्दिष्ट – पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणे – या दिशेने ठामपणे वाटचाल करत आहे.
india-made-its-position-more-clear-to-pakistan






