India vs Bangladesh 2nd Test Match: भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 3 गडी राखून पराभव केला आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी तुफानी खेळ दाखवला. या दोन खेळाडूंमुळेच टीम इंडियाचा विजय झाला. एकेवेळी भारताला ७१ धावा हव्या होत्या आणि फक्त तीनच विकेट हातात होत्या. पण अश्वीन अय्यरने बांगलादेशाच्या तोंडातील विजयाचा घास हिरावला.
अश्विनने शेवटच्या टप्प्यात सलग दोन चौकार मारत संघाला झंझावाती विजय मिळवून दिला. एकेवेळी टीम इंडिया 7 विकेट्स गमावून अडचणीत दिसत होती, मात्र अश्विन आणि अय्यरने शानदार विजय मिळवून दिला आहे. भारतीय संघाने पहिला कसोटी सामना 188 धावांनी जिंकला होता. हा सामना जिंकत भारताने मालिकेत क्लीन स्वीप केला.
145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. केएल राहुल आणि शुभमन गिल स्वस्तात बाद झाले. केएल राहुलने 2 आणि शुभमन गिलने 7 धावा केल्या. विराट कोहलीला केवळ एकच धाव करता आली. त्याचवेळी चेतेश्वर पुजाराने ४ धावांचे योगदान दिले.
टीम इंडियाने अवघ्या 45 धावांत चार विकेट गमावल्या. यानंतर चौथ्या दिवसाच्या खेळात मेहदी हसनने आपली किलर गोलंदाजी सुरू ठेवली आणि शानदार फलंदाजी करणाऱ्या अक्षर पटेलला 34 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर त्याने धोकादायक दिसणाऱ्या ऋषभ पंतला 9 धावांवर बाद केले.
बांगलादेशच्या दुसऱ्या डावात लिटन दास (73) याने अर्धशतक झळकावले आणि लिटन दासच्या आधी झाकीर हसन (51) याने पहिले कसोटी अर्धशतक पूर्ण केले. हसनने या सामन्यात पदार्पण केले. पहील्याच सामन्यात त्याच्या बॅटमधून अर्धशतक झाले. मोहम्मद सिराजने लिटन दास आणि तस्किनची अर्धशतकी भागीदारी मोडली.
सिराजने 67 व्या षटकात लिटन दासला क्लीन बोल्ड करून 76 चेंडूत 60 धावांची भागीदारी मोडली. लिटन दासच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने भारताला 145 धावांचे लक्ष्य दिले. भारताकडून दुसऱ्या डावात अक्षर पटेलने 3, मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विनने 2-2 बळी घेतले.
बांगलादेशने पहिल्या डावात 227 धावा केल्या. बांगला संघाकडून मोमिनुल हकने सर्वाधिक 84 धावा केल्या. बाकीचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. सरतेशेवटी मुशफिकर रहीम आणि लिटन दास यांनी विकेटवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांना यश मिळू शकले नाही आणि बांगलादेश संघाची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली. भारताकडून उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी चार बळी घेतले. जयदेव उनाडकटने दोन गडी बाद केले.
भारतीय संघाने पहिल्या डावात 314 धावा केल्या होत्या. टीम इंडियासाठी श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी शानदार खेळी केली. पंतने 93 धावा केल्या, मात्र त्याचे शतक हुकले. त्याचवेळी श्रेयस अय्यरने 87 धावांचे योगदान दिले. या दोघांमुळे टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरली.
विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने 24-24 धावा केल्या. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीला अप्रतिम खेळ दाखवता आला नाही. पंत आणि श्रेयस अय्यरमुळे भारताला 87 धावांची आघाडी मिळाली. बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि तैजुल इस्लामने 4-4 विकेट घेतल्या. तस्किन अहमद आणि मेहदी हसन यांना 1-1 विकेट मिळाली.
महत्वाच्या बातम्या
ritesh deshmukh : ‘मी तुमची हात जोडून माफी मागतो पण कृपया…’; रितेश देशमुखवर का आली ही वेळ? जाणून घ्या…
subramanyam swami : मोदी हिंदुत्ववादी नाही, ज्यांना वाटतं ते चांगले काम करताय ते मोदीचे चमचे; भाजप नेत्याचा घरचा आहेर
जुळ्या नातवांचे मुकेश अंबानींकडून जोरदार स्वागत; १ हजार पुजाऱ्यांवर उधळले ३०० किलो सोने