शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर गेल्या चार दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरु होती. तब्बल 100 तासानंतर अखेर चौकशी संपली आहे. आयकर विभागाचे अधिकारी जाधव यांच्या घरातून बाहेर पडले आहेत. त्यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवीन ट्विट केले आहे.
शुक्रवारी सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी जाधव यांच्या घरी तळ ठोकून होते. यशवंत जाधव यांच्या माझगाव मधील घरी ही कारवाई सुरू होती. त्यानंतर तब्बल 100 तासानंतर सोमवारी साडेनऊच्या सुमारास ते परतले. चार दिवसांच्या चौकशीत अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे कागदपत्रे जप्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.
तसेच 33 ठिकाणच्या झाडाझडतीत एकूण 2 कोटींच्या राकमेसह महत्वपूर्ण कागदपत्रे अधिकाऱ्यांनी जप्त केली असल्याचे समोर आले. या छापेमारी दरम्यान यशवंत जाधव यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.
यशवंत जाधव यांनी अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल 15 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात आरोप केले होते. आयकर विभागाच्या नोटीसला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकण्यात आली.
दरम्यान आयकर विभाग घराबाहेर पडल्यानंतर किरीट सोमय्या यांनी ट्विट केले की, यशवंत जाधव यांनी केलेल्या घोटाळ्यासंदर्भात आम्ही 18 ऑगस्ट रोजी आयकर विभाग आणि ईडी कडे तक्रार दाखल केली होती. सोमय्या यांच्या ट्विट ने राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहेत.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1498134381210537985?t=p5DMZ5dF7BTSMy2JxQNnAA&s=19
जानेवारी महिन्यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. मुंबईत कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर असतानाच शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. त्यामुळे जाधव यांच्या घरातून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती काय लागते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.