वावर एकरभर आणि उत्पन्न लाखांवर; वाचा काय टेक्निक वापरलंय या शेतकऱ्याने

महाराष्ट्र शासनाकडून रोजगार हमी योजनेतून विहिरी खोदण्यासाठी ९० हजार रुपयांचे अनुदान मिळते. त्यातून विहीर खोदली. त्यातून ठिबक सिंचनाचे पुरेपूर नियोजन. यातून फक्त एक एकरामधून दरवर्षी लाखोंचे उत्पन्न. ही गोष्ट आहे धुळे तालुक्यातील आनंदा सीताराम बागूल यांची. अवघ्या ४३ गुंठे शेतीतून दरवर्षी ते किमान ३ लाख रुपयांचे उत्पन्न घेतात.

धुळे शहरापासून मेहेरगावमार्गे लामकाणीकडे जाताना नवलाने हे गाव लागते. या गावात प्रवेश करताच सुरुवातीला एक हिरवेगार शेत आणि फळभाजीपाल्यांसाठी उभारलेला एक हिरवागार मांडव दिसून येतो. अवघ्या एका एकरात त्यांनी नंदनवन फुलवले आहे. आपल्या परिसरात त्यांनी शेतकऱ्यांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

बागूल यांची वाटणी झाल्यानंतर त्यांना ही एक एकरची जमीन मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पारंपरिक पिकांच्या ऐवजी भाजीपाला लागवडीचा निर्णय घेतला. काही भागात पालक, काही भागात वांगे, तर काही भागात फ्लॉवर, कारले असे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी ४० हजार रुपये खर्च करून पूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचनाने जोडून घेतले.

दर महिन्याला त्यांना यातून २५ ते ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. या कामात त्यांना त्यांची पत्नी, मुले नेहमीच मदत करतात. त्यामुळे त्यांचा मजुरांचा खर्चही वाचतो. भाजीपाला पिकाला कमीत कमी रासायनिक खते, कीटकनाशके, आणि नियमितपणे भाजीपाल्याची निगा आणि लागवड यामध्ये कमीत कमी खर्च त्यामुळे त्यांना हा व्यवसाय खूप परवडतो.

ते किंवा त्यांची मुले स्वतः भाजीपाला विकायला नेतात. कधी कधी धुळे शहरात ते भाजीपाला विकतात. याशिवाय कुसुम्बा, लामकाणी, मेहेरगाव, आनंदखेडे येथेसुद्धा ते भाजीविक्रीसाठी जातात. रासायनिक खतांचा कमीत कमी वापर बागुल करतात. दर दोन वर्षांनी शेतात भरपूर शेणखत टाकतात.

दोन वर्षांपूर्वी त्यांनी भाजीपाल्याबरोबर आंब्याच्या ४१ रोपांची लागवड केली होती. ही रोपे आता चांगलीच मोठी झाली आहेत त्यामुळे काही दिवसांत ते आंब्याचा व्यापार देखील करणार आहेत. याशिवाय ते विहिरी बांधण्याचे कामही करतात. त्यांची या कामातील प्रगती बघता त्यांच्याकडे विहिरीचे कामदेखील येते.

बागुल यांची मुले पंकज व राकेश सध्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयातून घरी आल्यावर ते शेतीला प्राधान्य देतात. वडिलांसोबत शेतात भाजीपाला लागवड, निंदणी, काढणी आणि विक्री ही सर्व कामे ती करतात. मुलांच्या मदतीने त्यांचा मजदूरांचा खर्च वाचला. त्यांना शेती करणे सोपे झाले. आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा अभ्यासही ही भावंडे करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.