कट्टर राजकीय विरोधक इम्तियाज जलील व चंद्रकांत खैरेंचे ‘या’ धार्मिक मुद्द्यावर झाले एकमत

 

औरंगाबाद | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैर एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. पण कोरोनामुळे का होईना पण त्यांचे एका मुद्द्यावर एकमत झाल्याचे दिसून आले आहे.

काहीच दिवसांवर असणाऱ्या बकरी ईदला मुस्लिम बांधवांना नमाज अदा करता यावा यासाठी मशिदी खुल्या कराव्यात अशी मागणी इम्तियाज जलील यांनी तर हिंदूंचा पवित्र महिना असलेल्या श्रावण महिन्यामध्ये मंदिरे खुली करावीत अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

बकरी ईद झाल्यानंतर गणेश उत्सव देखील येणार आहे त्यामुळे लोकांना आपल्या धार्मिक रितीरिवाजानुसार प्रार्थना करण्याची मुभा असावी अशी मागणी जलील हे वारंवार सरकारला करताना दिसत आहेत.

चंद्रकांत खैरे यांनीही धार्मिक विधी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांना आपल्या संसाराचा गाडा चालवता यावा यासाठीच मंदिरे खुली करण्याचे मागणी लावून धरली आहे.

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतलेली भूमिका इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या भूमिकेशी मिळतीजुळती असल्याचे दिसून येत आहे. यावरून अनेक राजकीय मुद्द्यांवरून दोघांमध्ये खटके उडाले असले तरीही या मुद्द्यावर मात्र दोघांचेही एकमत झाले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.