Malegaon Blast Verdict: तब्बल 17 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मालेगाव (Malegaon) बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल जाहीर झाला आणि एनआयए विशेष न्यायालयाने (NIA Special Court) सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता दिली. न्यायालयाने स्पष्ट केलं की, केवळ संशयावरून आरोपींना दोषी धरणं योग्य नाही. मात्र या निकालानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
एमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी या निकालावरून तत्कालीन राज्य सरकार, भाजप आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपींवर तीव्र टीका केली.
“धार्मिक दहशत निर्माण करण्यासाठी स्फोट”
जलील म्हणाले, “मालेगावमध्ये झालेला बॉम्बस्फोट हा केवळ दहशत निर्माण करण्यासाठी आणि समाजात धार्मिक फूट पाडण्यासाठी घडवण्यात आला होता. जर आज सगळेच निर्दोष ठरत असतील, तर हा स्फोट कोणी घडवला? साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खरंच निर्दोष असतील, तर त्यांना तुरुंगात टाकण्याची हिंमत कोणा होती? त्याचप्रमाणे, तेव्हा आर्मीतील अधिकारी ले. कर्नल पुरोहित यांना कोणी अडकवलं?”
ते पुढे म्हणाले की, या निकालामुळे देशातील न्यायप्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भाजपने या प्रकरणाचा राजकीय फायदा घेत भोपाळ (Bhopal) मतदारसंघातून साध्वींना उमेदवारी देऊन संसदेत पाठवलं. “त्यांची पात्रता एवढीच की त्या मालेगाव प्रकरणातील आरोपी होत्या. आज आपणच आरोपींना संसदेत बसवतो, हा कोणता संदेश देशाला देता?” असा सवाल त्यांनी केला.
जलील यांनी दिवंगत अधिकारी हेमंत करकरे (Hemant Karkare) यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “करकरे यांनी या प्रकरणात सत्य बाहेर आणलं होतं, पण त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द समोर आला. पण निकाल बघता आज त्या शब्दाचं काय?”
काँग्रेस-राष्ट्रवादीवरही टीका
जलील यांनी या घटनेच्या काळातील राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारलाही लक्ष्य केलं. “ही घटना घडली तेव्हा आर. आर. पाटील (R. R. Patil) गृहमंत्री होते, तर विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) मुख्यमंत्री होते. त्यांनी असं ठरवलं होतं का की, अशा घटनांमध्ये कोणालाही पकडून केस चालवायची आणि वर्षानुवर्षे चालू ठेवायची?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
विशेष न्यायालयाने दिलेल्या निरीक्षणानुसार, सरकारी पक्षाला आरोपींविरुद्ध ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आलं. केवळ संशयावरून आरोपींना दोषी ठरवणं शक्य नाही, म्हणून त्यांना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे.