‘एमपीएससी’चे महत्वाचे निर्णय;पहिला राज्यसेवा परीक्षेचे केंद्र बदलण्यास मुदतवाढ आणि दुसरा..

 

सोलापूर | राज्यातील कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील गरीब आणि होतकरू मुलांना अन्य जिल्ह्यांच्या परीक्षा केंद्रावर जाणे अवघड झाले आहे.

विद्यार्थ्यांना आता केंद्रावर जाण्यासाठी अडचणी येऊ नये. यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांच्या सोयीसाठी ११ ऑक्टोबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणचे सोयीचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी दिली आहे.

तसेच दुसऱ्या निर्णयात आयोगाने २० सप्टेंबरला होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडलेल्या दुसऱ्या विभागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यासाठी २० ऑगस्टपर्यंत मुदत वाढ केली आहे.

जिल्हा केंद्र निवड न करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी भरलेल्या त्यांच्या अर्जातील कायमस्वरूपीच्या रहिवासी पत्त्यावर असलेल्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार आहे.

तसेच जिल्हा केंद्राची क्षमता संपल्यानंतर जिल्हा केंद्राची निवड न करणाऱ्या अथवा निवड करू न शकलेल्या उमेदवाराला आयोगाकडून उपलब्ध केलेल्या केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असणार आहे.

दरम्यान, नव्याने जिल्हा केंद्र निवडण्यासाठी सर्व उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मॅसेज पाठवण्यात येणार आहे.

तसेच त्या व्यवस्थेप्रमाणे निवडण्यात आलेल्या जिल्हा केंद्र  बदलण्याची विनंती यापुढे कोणत्याही कारणास्तव मान्य केली जाणार नसल्याचे, आयोगाने स्पष्ट केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.