मी वाढदिवस साजरा करणार नाही; आपल्या शुभेच्छा कोविड योद्धांना समर्पित करत आहे

 

मुंबईत। राज्यात कोरोनाने कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यामुळे विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या परिस्थितीमुळे अनेक राजकीय नेत्यांनी यावर्षी आपले वाढदिवस साजरे केलेले नाहीत.

यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव देखील जोडले जाणार आहे. ‘मी वाढदिवस साजरा करणार नसून कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

पुढे ते म्हणाले आहेत की,’हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी. वाढदिवसाच्या निमित्ताने नियम पाळून वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत.

तसेच मोठ्या प्रमाणात रक्त दान, प्लाझ्मा दान करावे’. २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. ‘यादिवशी कुणीही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लाऊ नये किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये.

गेल्या ४ महिन्याभपासून राज्य सरकार नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने कोरोनाची लढाई लढत आहे. आणि आपल्या प्रयत्नांमुळे चांगले परिणामही दिसत आहेत’, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

‘कोरोनाचा धोका टळलेला नाही, उलटपक्षी आता आपल्याला अधिक सावध राहून नियमांचे पालन करायचे आहे. आपण दिलेल्या शुभेच्छा मी सर्व कोविड योद्ध्यांना समर्पित करीत आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.