“संकटात केंद्राकडे मदत मागितली तर मेहरबानी केल्यागत तुकडे फेकले जातात”

मुंबई । राज्यातील भाजपची सत्ता गेल्यापासून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर टीका करत आहे. यामध्ये शिवसेना भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.

आता सामनातून शिवसेनेने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईसह महाराष्ट्र देशाचे पोट भरते. रोजगार, पोटापाण्याच्या बाबतीत मुंबईची अवस्था ‘आव जाव घर तुम्हारा और खर्चा पानी हमारा’ अशी झाली आहे.

एकटे मुंबई शहर देशाच्या तिजोरीचा 25 टक्के हिस्सा भरते, तेव्हा देशाचा गाडा पुढे सरकतो, पण एखाद्या संकटकाळी केंद्राकडे मदतीची मागणी केलीच तर मेहरबानीच केल्याच्या थाटात तुकडे फेकले जातात, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी भूमिपुत्रांनाच सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार असल्याचे म्हटले आहे. यावरून शिवसेनेने सामनाच्या आग्रलेखातून टीका केली आहे.

आज उत्तर प्रदेश, बिहारात रोजीरोटीची व्यवस्था नाही म्हणून त्या राज्यांतून रोज हजारो मजूर मुंबईकडे पळत आहेत. मध्यप्रदेशने तर दरवाजेच बंद करून ठेवले. त्यामुळे रोजगारासाठी हे लाखोंचे लोंढे पुन्हा मुंबईवरच आदळताना दिसत आहेत.

त्यामुळे इतरांनी काखा वर केल्या तरी राष्ट्रीय एकात्मतेचे लचांड फक्त महाराष्ट्रालाच सांभाळावे लागेल, असे शिवसेसेने म्हटले आहे. प्रत्येक राज्य हे आपापल्या लोकांची काळजी घेतच असते.

महाराष्ट्राने ती काळजी घेतली की, देशभरातील सगळ्यांचीच नरडी गरम होतात. मध्यप्रदेशने त्याच राष्ट्रीय एकात्मतेवर हातोडा मारला, तेव्हा सगळे चिडीचूप कसे आहेत?, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

नरेंद्र मोदी हे राज्यांना मदत करताना महाराष्ट्राला कमी मदत करतात असा आरोप नेहेमी केला जातो. यावरून शिवसेना मोदी सरकारवर नेहेमी टीका करत असते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.