राज्य सरकारने धाडस असेल तर अधिवेशन घेऊन दाखवावे नंतर मी केंद्राचं बघतो: उदयनराजे भोसले

मागील काही दिवसापासून बहुप्रतिक्षीत असलेल्या संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्या भेटीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यात पुण्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पुण्यात बैठक झाली. यात मराठा आरक्षणासाठी राज्याने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी राज्यकर्त्यांना मराठा आरक्षण समाजाला द्यायचंच नाही. त्यांची इच्छाशक्तीच नाही. आजचे राजकारणी व्यक्तीकेंद्रीत झाले आहेत. त्यामुळे उद्या समाजाचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण?, असा सवाल करतानाच कोर्ट कचेऱ्यांवर माझा विश्वास नाही, असे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

 खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, मराठा आरक्षण ही राज्याची जबाबदारी आहे. जर हे सगळे आमदार, खासदार एवढे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतील तर नेमकी समस्या काय आहे. राज्य सरकारने धाडस असेल तर अधिवेशन घेऊन दाखवावं नंतर मी केंद्राचं पाहतो.  अधिवेशन बोलवून गायकवाड कमिशनच्या रिपोर्टवर चर्चा करावी.

आता जस्टीस भोसले यांचा रिपोर्ट आला आहे. थप्पी गोळा करुन काय रद्दीत विकून त्यावर राज्य चालवणार का? काय फालतुगिरी सुरु आहे, असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला. तसेच दिशाभूल करणे, संभ्रम निर्माण करणे, आमच्या रक्तात नाही, असं खासदार उदयनराजे भोसलें यांनी बोलून दाखविले होते.

तसंच आमच्यात कोणतंही दुमत नाही. आम्ही नेहमीच एकत्रित काम करत आलो आहोत असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले होते. संभाजी छत्रपती यांनी आज उदयनराजे भोसले यांच्याशी मराठा आरक्षणावर २५ मिनिटे चर्चा केली. त्यानंतर दोन्ही राजेंनी मीडियाशी संवाद साधून मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ३३८ बी नुसार आयोग स्थापन करावं लागेल.

मराठा समाज हा सामाजिक मागास असल्याचं सिद्ध करावं लागेल. हा अहवाल राज्यपालांना पाठवावा लागेल. राज्यपाल राष्ट्रपतींना पाठवतील, मग तो केंद्रीय मागास आयोगाकडे जाईल. त्यांना वाटल्यास ते आरक्षण देतील. आरक्षण मिळण्यासाठीचे मी दोन चार पर्याय दिले आहेत. त्यामुळे कोणत्या मार्गाने जायचं हे राज्यकर्त्यानेच ठरवावं, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.