Operation Sindoor : संसदेतल्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) सुरु असलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) वादावर समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी बुधवारी राज्यसभेत (Rajya Sabha) सरकारला थेट प्रश्न विचारले. त्यांनी हल्ल्यातील पीडित कुटुंबांना श्रद्धांजली वाहताच, या मोहिमेच्या नावावरच सवाल उपस्थित केला.
त्या म्हणाल्या “जर कपाळावरचं कुंकूच पुसलं गेलं, तर मोहिमेचं नाव सिंदूर का ठेवलं? दहशतवाद संपवण्याचं सरकारनं वचन दिलं होतं, मग त्याचं काय झालं?”
पहलगाम हल्ला आणि सिंदूर मोहिमेवर सवाल
जया बच्चन यांनी सर्वप्रथम पहलगाम (Pahalgam) येथील भीषण हल्ल्याचा उल्लेख करत, मृतांच्या कुटुंबियांना संवेदना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या “दहशतवादी इतक्या सहज कसे आले आणि इतक्या लोकांचा बळी कसा गेला? मला या घटनेचा फार दुःख आहे.” त्यांनी टीका केली की, मोहिमेला इतकं भावनिक नाव देणाऱ्यांनी विचार केला का की, जर सिंदूरच नष्ट झालं, तर नावाला अर्थ काय उरतो?
काश्मीरचा स्वर्ग आणि तुटलेला विश्वास
त्या पुढे म्हणाल्या “जे यात्रेकरू तिथे गेले होते, ते 370 कलम हटवल्यानंतर छाती ठोकून गेले होते. त्यांना वाटलं होतं की आता तिथे दहशतवाद संपला आहे. काश्मीर (Kashmir) आमच्यासाठी स्वर्ग आहे, पण त्याचा बदल्यात त्यांना काय मिळालं? सरकारनं त्यांच्या विश्वासाला तडा दिला. मृतांच्या कुटुंबांना हे सरकार कधीही माफ करता येणार नाही.”
जया बच्चन यांनी सरकारला विचारलं “तुम्ही त्या कुटुंबांची माफी मागितली का? हे तुमचं कर्तव्य आहे. फक्त तोफा, दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांची खरेदी पुरेशी नाही. त्या 26 जणांचे प्राण आपण वाचवू शकलो का? दारूगोळ्यानं काही साध्य होणार नाही, मानवतेची गरज आहे.”
त्यांनी सभागृहातील सदस्यांना उद्देशून सांगितलं “मी तुम्हा सर्वांना विनंती करते की नम्र राहा. जनतेनं तुमच्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याचं रक्षण करा. पदाचा मान ठेवा.”