‘बाळासाहेब ठाकरे आज असते, तर ते इंदोरीकर महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असते’

पुणे | उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी असताना निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, याचे वाईट वाटते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते, तर ते इंदोरीकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असते.

या राज्यात हिंदू धर्मातील प्रबोधनकाराला त्रास होतो. तरीही ठाकरे सरकार गप्प बसते. अशा शब्दांत आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

इंदोरीकर महाराज यांच्यावर कीर्तनातील एका वाक्‍यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. बाळासाहेब ठाकरे आज असते, तर इंदोरीकर महाराज यांच्यावर ही वेळ आली नसती. असे मत मेटे यांनी व्यक्त केले आहे.

हे सरकार हिंदुत्ववादी विचारांच्या साधू, संतांना त्रास देण्याचे काम करत आहे. प्रसिद्धीला हपापलेल्या लोकांना त्यांच्यावर टीका करायला कोणीतरी भाग पाडत आहे, असा आरोप मेटे यांनी केला.

अशा लोकांचे ऐकून सरकार इंदोरीकर यांना त्रास देत आहे. इंदोरीकर यांच्यासारखे लोक समाजात प्रबोधन करत आहेत. म्हणून आम्ही इंदोरीकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. असेही मेटे यांनी सांगितले.

निवृत्ती महाराज इंदोरीकर गेल्या पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्रातील जनतेचे प्रबोधन करत आहेत.  महाराष्ट्रातील हजारो तरुणांना व्यसनमुक्त करणाऱ्या इंदोरीकर यांच्यावर अशी वेळ येते, याचे वाईट वाटते. असे मेटे म्हणाले.

आतापर्यंत त्यांच्याबद्दल कोणाची काही तक्रार नाही. मग आताच त्यांच्याबद्दल तक्रारी का होत आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. कोणाच्या सांगण्यावरून इंदोरीकर यांना टार्गेट केले जात आहे? असा सवाल मेटे यांनी उपस्थित केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.