मी वाघाची शिकार केलीय! ‘टायगर अभी जिंदा है’ला दिग्विजय सिंगांचा जबरदस्त पलटवार

 

मध्य प्रदेश। मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा गुरूवारी विस्तार करण्यात आला. त्यानंतर मध्य प्रदेशातील राजकारण चांगलेच तापल्याचे बघायला मिळत आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपात दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचा वरचष्मा दिसला. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आपले मौन सोडले.

माजी मुख्यमंत्री कमलनाथ व काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांना ‘टायगर अभी जिंदा है’ या शब्दात त्यांनी इशारा दिला. त्यानंतर दिग्विजय सिंग यांनीही वाघाच्या शिकारीला जाण्याचा किस्सा सांगत ज्योतिरादित्य शिंदे यांना उत्तर दिले आहे.

दरम्यान दिग्विजय सिंह यांनी तब्बल तीन ट्विट केले आहेत. यातून त्यांनी वाघाच्या शिकारीपासून ते भाजपात आणखी किती वाघ तयार होणार इथपर्यंत समाचार घेतला आहे.

दिग्विजय सिंह यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये असे म्हंटले आहे की, “जेव्हा शिकार करण्यावर बंदी नव्हती. तेव्हा मी आणि श्रीमंत माधवराव शिंदेजी वाघाची शिकार करायचो.

इंदिरा गांधींनी वन्यजीव संरक्षण कायदा आणल्यानंतर मी आता फक्त वाघाचे फोटो काढत असतो”. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी दोन वाघांचा फोटो शेअर करून वाघाच्या स्वभावाविषयी सांगितले आहे.

“वाघाचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. एका जंगलात एकच वाघ राहतो,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तर तिसऱ्या ट्विटमध्ये दिग्विजय सिंग यांनी मंत्रिमंडळ विस्तारवरून टीका केली आहे.

शिवराज सिंह चौहान व ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचा व्हिडीओ त्यांनी ट्विट केला आहे. “वेळ सर्वात शक्तीशाली आहे. भाजपाचं भविष्य, या मंत्रिमंडळ विस्ताराने भाजपाचे किती वाघ जिवंत केले आहेत, माहिती नाही. आता पाहत रहा,” असे दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.