मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतल्यानंतर, आता शिवसेना नेते संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे.
आता संजय राऊत यांनी या मुलाखतीचा दुसरा प्रोमो रिलीज केला आहे. संजय राऊत यांनी हा प्रोमो ट्विटरवर शेअर केला आहे. या प्रोमोत उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष करत, निशाणा साधला आहे.
या प्रोमोत, विरोधी पक्षाकडून सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही. सरकार पडू शकते असा वारंवार आरोप केला जात आहे, या विषयावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मी इथेच बसलो आहे, मुलाखत चालू असताना सरकार पाडून दाखवा, असे खुले आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले आहे.
तसेच महाराष्ट्रात तीन चाकी सरकार आहे, असे विरोधी पक्ष म्हणतात. याबाबत विचारले असता, मग केंद्रात किती चाकी सरकार आहे? असा प्रतिप्रश्न विचारत, उद्धव ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी घेतलेली उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीचे प्रसारण २५ आणि २६ जुलैला दोन भागात करण्यात येणार आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली आहे.