Share

Hotel Bhagyashree News: ‘हॉटेल भाग्यश्री’च्या मालकाचे अपहरण, पाच जणांनी बेदम मारून पुलावर फेकलं

Hotel Bhagyashree News: सोशल मीडियावर सतत चर्चेत असलेल्या हॉटेल भाग्यश्री (Hotel Bhagyashree) च्या मालकावर भीषण हल्ला झाला आहे. नागेश मडके (Nagesh Madke) यांचं बुधवारी सायंकाळी अपहरण करण्यात आलं. पाच जणांच्या टोळीने त्यांना जबरदस्तीने गाडीत ओढून नेऊन पाच किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेलं आणि वाटेत बेदम मारहाण केली. इतकंच नव्हे तर “ह्याला मारून टाकायचं” असं म्हणत त्यांना पुलावर फेकून दिल्याचा आरोप मडके यांनी केला आहे.

सेल्फीच्या बहाण्याने बोलावलं आणि अपहरण

ही संपूर्ण घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. मडके हे त्यांच्या हॉटेलजवळ उभे असताना एक चारचाकी गाडी थांबली. गाडीतल्या लोकांनी सेल्फी काढण्याचा बहाणा करत त्यांना बोलावलं. मडके गाडीपाशी गेले असता गाडीच्या खिडकीतून ओढून त्यांचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांना गाडीत टाकून पाच किलोमीटर दूर नेत, तुफान मारहाण करण्यात आली.

पुलावर फेकण्यापूर्वी दिल्या धमक्या

अपहरणकर्त्यांनी गाडीतून त्यांना अक्षरश: फरफटत नेत मारहाण केली. “ह्याला मारून टाकायचंय, मरेपर्यंत सोडायचं नाही” अशा धमक्या देत ते त्यांना एका पुलाजवळ घेऊन गेले आणि शेवटी वडगाव (Vadgaon) येथील पुलावर फेकून दिलं. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मडके यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याआधीही आले होते धमकीचे फोन

या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मडके यांना याआधीही धमकीचे फोन आले होते. त्यांचं नाव सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत आलं होतं, त्यानंतर हा हल्ला नेमका कुणी आणि का केला याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या पोलिसांकडून या घटनेबाबत अधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now